पुणे : शिवाजीनगर न्यायालयात "फ्रेंड ऑफ कोर्ट' ची नियुक्ती करून बलात्काराचा दावा निकाली काढण्यात आला. यात एका 68 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीची सत्र न्यायाधीश ए.आय.पेरमपल्ली यांनी निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायाधीश आशिष आयाचित यांनी "फ्रेंड ऑफ कोर्ट' ची नियुक्ती केली होती.
ज्येष्ठ व्यक्ती काम करत असलेल्या एजन्सीमार्फत 75 वर्षाच्या ब्राम्हण ज्येष्ठ नागरिकाच्या घरी राहून घरकाम करण्यासाठी 50 वर्षीय ब्राम्हण अथवा मराठा महिला हवी आहे, अशी जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात आली होती. 24 ऑगस्ट 2014 रोजी दिलेल्या जाहिरातीत महिलेला 10 ते 15 हजार रुपये पगार देण्यात येईल, असे म्हटले होते. ही जाहिरात पाहुन पीडितेने संपर्क साधला. ती एजन्सीच्या ऑफिसला गेली. त्याने त्या व्यक्तीशी बोलणे करून दिले. त्यानंतर तिने कामाची गरज आहे. राहायला जागा नाही, असे त्याला सांगितले. तो तिला कोथरूड येथे घेऊन गेला. "मी पण एकटा आहे. माझ्या गरजा पूर्ण केल्यास हवे ते देईन' असे म्हणत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कोट ऑफ फ्रेंडची नियुक्ती कशासाठी ? या प्रकरणात आरोपी स्वत: खटला चालवित होता. त्याने वकील दिला नव्हता. "लिगल ऍड'चाही वकील घेतला नव्हता. स्वत: साक्षीदारांची उलट तपासणी घेत होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या शंकाचे निरसन करण्यासाठी, तसेच योग्य तो न्याय देण्यास मदत करण्यासाठी या दाव्यात "फ्रेंड ऑफ कोर्ट'ची नियुक्ती केली होती.अँड. सचिन ठोंबरे यांनी अनेक फौजदारी दावे चालविले आहेत. त्यांना तब्बल 20 वर्षाहून अधिक काळ फौजदारी प्रॅक्टीस केल्याचा असलेल्या अनुभवाचा विचार करून ही नियुक्ती झाली होती. कोर्ट ऑफ फ्रेंड म्हणून नेमल्याची सत्र न्यायलयायातील ही पहिलीच वेळ असल्याचे अँड ठोंबरे यांनी सांगितले.