पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत गेलेल्या आकड्यांसोबत मृतांचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ लागत आहे. अंत्यविधींचा प्रक्रिया सुलभ व्हावी, तसेच कमीतकमी वेळ लागावा याकरिता प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नुकतेच पालिकेने शववाहिका ॲप सुरू केले आहे. यासोबतच विविध स्मशानभूमींसाठी १९ अभियंत्यांची नेमणूक केली आहे.
पालिकेच्या हद्दीतील विद्युत दाहिन्या आणि गॅस दाहिन्यांचे नियंत्रण तसेच तातडीच्या दुरुस्त्या वेळेत व कार्यक्षमरित्या करण्यासाठी अभियंत्याची नियुक्ती केली आहे. स्मशानभूमीतील ''वेटिंग''च्या सद्यःस्थिती बाबत ‘लोकमत’ने सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेत पालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने ही समस्या दार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ‘शववाहिका ॲप’ सुरू केले. या अॅपद्वारे शववाहिका उपलब्धता, रुग्णालय आणि नातेवाईक यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्यास मदत झाली आहे. यासोबतच आता १९ अभियंत्यांची नेमणूक केली आहे.
या अभियंत्यांनी दिवसभरात दहन करण्यासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या, वेळ, विद्युत अथवा गॅस दाहिनी रिकामी असल्यास त्याची वेळ, अन्य अडचणी असल्यास त्याची सर्व माहिती दररोज व्हॉटसॲपद्वारे देण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहेत.
दाहिनीचे दरवाजाची रोज तपासणी करणार
विद्युत दाहिन्या व गॅस दाहिन्या बंद पडू नयेत यासाठी वेळेत त्याची दुरुस्तीची कामे करणार आहे. दाहिन्या बंद पडू नयेत याकरिता दाहिनीमध्ये होणाऱ्या दोन दहनांमध्ये अर्धा ते एक तासाचे अंतर ठेवणार आहे. दर पंधरा दिवसांनी दाहिनी बंद ठेवून चिमणी सफाईची कामे केली जाणार आहेत. दाहिनीचे दरवाजाची रोज तपासणी केली जाणार असून आवश्यक असल्यास त्वरित बदलण्यात यावेत.
विद्युत हिटिंग कॉइल, गॅस बर्नरची वारंवार तपासणी
स्क्रबर यंत्रणेमधील ब्लोअर आणि पंप योग्य रीतीने सुरू आहेत किंवा नाही तसेच पाण्याची तपासणी केली जाणार आहे. दाहिनीच्या चेंबरमधील स्वच्छता, विद्युत हिटिंग कॉइल, गॅस बर्नरची वारंवार तपासणी केली जाणार आहे. दाहिनीच्या चेंबरचे वेल्डिंग खराब होऊन धूर खाली पसरत असल्यास त्वरित वेल्डिंग करून घेण्यात यावे, असे आदेश डॉ. खेमणार यांनी दिले आहेत.