पुणे: राज्यात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनारुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांना अहोरात्र काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर प्रचंड ताण आला आहे. पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याअंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात २५० विशेष पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांमध्ये यांची मोठी मदत होणार आहे.
त्यानिमित्त लोणी काळभोर येेेथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कुलच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर नामदेव चव्हाण, पुणे शहर कल्याणराव विधाते सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुभाष काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक जे. डी. हंचाटे, निकेतन निंबाळकर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड आदी उपस्थित होते. लोणी काळभोर, उरुळी कांचन, उरुळी देवाची येथील एकूण २५० युवक, युवती हे विशेष पोलीस अधिकारी म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्यास मदत करणार आहेत.
यावेळी नामदेव चव्हाण म्हणाले, सध्या लॉकडाऊनमुळे सर्व नागरिक घरात आहेत. मात्र पोलीस रस्त्यावर नागरिकांच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. पोलिसांना स्वतःच्या कुटुंबाला एरवीही वेळ देता येत नाही. दोघांनाही एकमेकांकडून मानसिक आधाराची गरज असते. सद्यस्थितीमध्ये पोलिसांवरचा ताण कमालीचा वाढला आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून नागरिकांमधून विशेष पोलीस अधिकारी म्हणून आपली निवड करण्यात आली आहे. त्यामुळे काम करत असताना पोलिसांच्या लौकिकाला धक्का लागेेल असे गैैैैरवर्तन करू नका.