पुणे : मतदार नोंदणी आणि याद्यांच्या पुर्ननिरीक्षणासाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची ‘इलेक्टोरल रोल आॅब्झर्व्हर’ (मतदार नोंदणी पर्यवेक्षक) म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. मतदार याद्यांच्या पुर्ननिरीक्षणाचे काम व्यवस्थित सुरु आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आयोगाने ‘चेकलिस्ट’ तयार केली आहे. प्रक्रियेदरम्यान विभागीय आयुक्तांना त्यानुसार छाननी करुन अहवाल सादर करावयाचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकारांना दिली.मतदार नोंदणी अधिकारी आणि केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या नियुक्त्या आणि प्रशिक्षण योग्य प्रकारे सुरु आहे का, राजकीय पक्षांकडून केंद्रस्तरीय सहायकांच्या नियुक्त्या झाल्या आहे किंवा नाही, राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत का हे तपासण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेवर एकंदरीत नियंत्रण ठेवण्यासाठी प्राधिकृत अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे का, ही प्रक्रिया किती लोकांना माहिती झाली आहे, यामध्ये लोकाभिमुखता किती आहे, याची माध्यमांची मदत घेण्यात आली आहे का? यासंदर्भातही तपासणी होणार आहे. निवडणूक लोकसंख्या गुणोत्तरावरही विश्लेषणात्मक अहवाल सादर करावा लागणार आहे. लोकसंख्येच्या किती प्रमाणात मतदारांची नोंदणी झाली आहे, मतदार नोंदणी, याद्यांमधील बदल यासाठी जे अर्ज येतील त्याची निर्गती कशी झाली, त्याचा दर्जा कसा होता हे देखील पहावे लागणार आहे. मतदारांकडून आलेले अर्ज कसे प्राप्त होत आहेत, विशेष अभियान किती वेळा घेण्यात आले, किती ठिकाणी केंद्र सुरु आहेत, अर्जांची पोहोच संबंधितांना दिली जात आहे का, त्याची डेटा एंट्री व्यवस्थित होत आहे का, विहीत कालावधीत त्यावर अंतिम निर्णय होतोय का, अंतिम निर्णय झाल्यानंतर आक्षेप आल्यास त्याचे निराकरण केले जात आहे का, एकूण प्रक्रियेमध्ये स्वयंसेवी संस्थाचा तसेच नागरी सहभाग किती आहे याचीही तपासणी विभागीय आयुक्तांकडून केली जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.निवडणूक प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने त्यामुळेच विभागीय आयुक्तांची या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्ती केली आहे. टपाली मतदानातील किचकट पद्धतीमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे ही प्रक्रियाच आॅनलाईन करण्यात आली आहे. टपाली मतपत्रिका आॅनलाईन करण्यात आल्या आहेत. यासोबतच विशेष प्रशिक्षण सत्रही घेण्यात आलेले आहेत. - सौरभ राव, जिल्हाधिकारी, पुणे
पुण्यात मतदार याद्यांच्या पुर्ननिरीक्षणासाठी विभागीय आयुक्तांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 9:18 PM