पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:54 PM2020-04-27T15:54:51+5:302020-04-27T15:55:07+5:30
पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी आणखी एक पाऊल
पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यातील प्रामुख्याने शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून, त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.
राज्याच्या मुख्य सचिव कार्यालया मार्फत सोमवार (दि.27) रोजी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. तर सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त व कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.सौरभ राव यांनी पुणे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त म्हणून देखील काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो.
0000000