प्रशांत बिडवे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : राज्यात पवित्र पाेर्टलमार्फत पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या हाेत्या. १० ऑक्टाेबर अखेर १५ हजार उमेदवार प्रत्यक्ष शाळांमध्ये रुजू झाले आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील १० टक्के राखीव जागा, तसेच अपात्र, गैरहजर असल्याने रिक्त राहिलेल्या जागांसह शिक्षकभरतीचा दुसरा टप्पा केव्हा जाहीर हाेणार? याकडे पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त पदांवर शिक्षक भरतीला सुरुवात झाली. पहिला टप्प्यात ११ हजार ८५ पदांवर शिक्षक भरतीला २५ फेब्रुवारी राेजी सुरुवात झाली. त्यानंतर २६ जून राेजी ३ हजार ३०६ पदे आणि ३० जुलै राेजी उर्दू माध्यमाच्या ८७२ पदांसाठी भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारांची कागदपत्रे, तसेच चारित्र्य पडताळणी, आराेग्य तपासणीनंतर शाळांवर नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी सुमारे १३ हजार उमेदवार शाळांवर रुजू झाले आहेत.
पहिला टप्पा संपल्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाणार आहे. संचमान्यता, तसेच संस्थांकडून प्राप्त झालेल्या रिक्त पदांच्या जाहिराती यावरून दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची पदे भरणार, याबाबत आकडा निश्चित हाेईल. -सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त
‘रयत’ पदभरती, १६ ऑक्टाेबरला सुनावणी
रयत शिक्षण संस्थेमधील अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदे भरतीसाठी ८०१ उमेदवारांची शिफारस केली आहे. मात्र, पदभरतीविराेधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने उमेदवारांची नियुक्ती मागील सात महिन्यांपासून रखडली आहे. त्यावर येत्या १६ ऑक्टाेबर राेजी सुनावणी हाेणार आहे.
दुसऱ्या टप्प्यांत किती पदे भरणार?
राज्यातील शाळांमध्ये रिक्त शिक्षकांच्या पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास वित्त विभागाने परवानगी दिली हाेती. मात्र, त्यानंतरही १० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. यांसह पहिल्या टप्प्यात शिफारस केलेल्यांपैकी अपात्र, गैरहजर तसेच रुजू न हाेणे यामुळे सुमारे साडेचार ते पाच हजार पदे रिक्त राहणार आहेत.
मुलाखतीसह निवड प्रक्रिया संथगतीने
मुलाखतीसह शिक्षकभरती फेरीमध्ये ४ हजार ७२३ पदांवर नियुक्तीसाठी ७ हजार ८०५ उमेदवारांची शिफारस केली आहे. एसटी प्रवर्गातील उमेदवार न मिळणे, तसेच उमेदवार गैरहजर राहिल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांची संख्या अद्याप निश्चित नाही.