लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर स्थापन झालेल्या शिक्षण समितीवर मंगळवारी पक्षाच्या सदस्य संख्येनुसार १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
महापालिकेची शिक्षण समिती स्थापन झाली असली तरी, या समितीला आर्थिक बाबतीत अधिकार दिलेले नाहीत. शिक्षण विभागविषयी कोणताही निर्णय घेतला तरी, त्याच्या आर्थिक तरतुदीकरिता या समितीला स्थायी समितीच्या मान्यतेची आवश्यकता राहणार आहे.
पुणे महापालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा आज (दि. १६) ऑनलाइन पार पडली. या सभेत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या नावांची घोषणा केली. यात भाजपच्या सदस्यसंख्येनुसार शिक्षण समितीवरही भाजपाचा वरचष्मा राहिला आहे.
भाजपाकडून मंजूश्री खर्डेकर, कालिंदा पुंडे, राजश्री काळे, मुक्ता जगताप, मारूती तुपे, अल्पना वर्पे व वर्षा साठे यांची नियुक्ती केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, लता धायरकर, सुमन पठारे यांची व काँग्रेसकडून अविनाश बागवे तर शिवसेनेकडून प्राची आल्हाट यांची नियुक्ती केली आहे.
--
समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांना गाडी
नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण समितीला कोणतेही आर्थिक अधिकार नसले तरी, या समितीचे कार्यालय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात स्वतंत्ररीत्या उभारणार आहे. तसेच समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शिक्षण मंडळाकडून चारचाकी वाहन देणार आहे. याबाबत शिक्षण समिती सदस्य नियुक्ती च्या प्रस्तावाच्या वेळी उपसूचना दिली. त्यासही सभेत मान्यता देण्यात आली.