उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल: इंजेक्शनच्या साठा, वापरावर नियंत्रण राहणार
बारामती: शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबर रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने शेकडो रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. ‘लोकमत’ने याबाबत प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेत पवार यांच्या सुचनेनंतर ‘रेमडेसिविर आवक जावक वापर समिती’ची नियुक्ती केली आहे. या समितीचे इंजेक्शनचा साठा आणि वापरावर नियंत्रण राहणार आहे.
इंजेक्शन वेळेत उपलब्ध न झाल्यास काही रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या समितीमुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे. समितीच्या अध्यक्षपदाची प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वैद्यकीय महाविद्यालय प्रतिनिधी डॉ. मस्तुद, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे डॉ. विजय नांगरे यांना समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार दररोज बारामती शहरातील ५ ते ७ मुख्य वितरकांना आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठ्याची नोंद घेणे, मुख्य वितरकांकडून इतर २७ सब वितरक रुग्णालयाला स्टॉक वितरीत करणे (बेड रुग्णाच्या प्रमाणात), रुग्णालयात दाखल रुग्णांना ज्यांना रेमडेसिविर इंजेक्शन द्यावयाचे आहे, त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी नमुना अर्ज भरुन मेल करावयाचा आहे. यात रुग्णाचे नाव, स्टोअर व कोणत्या कारणाने रेमडेसिविर द्यावयाचे आहे ते नमुद करावे, समिती डॉक्टर ते पाहून त्यावर त्वरित निर्णय घेतील, आवश्यकता असल्यास ते त्वरित मान्यता देतील. मान्यता दिलेल्या रुग्णास देण्याचे इंजेक्शन, दवाखाना, स्टोअर स्टॉकमधून खर्ची घातले जातील. ज्या ठिकाणी इंजेक्शन जादा किंवा कमी आहे. त्याबाबत वापराचे नियोजन समिती डॉक्टर करतील. तातडीच्या काळात वेळीअवेळी रात्री डॉक्टरांना रुग्णास इंजेक्शन द्यावे लागल्यास त्यांनी ते द्यावे, त्याची कार्याेत्तर मंजूर करण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार
रेमडेसिविर इंजेक्शनचा काही ठिकाणी काळाबाजार सुरु असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळले आहे.‘एमआरपी’च्या सहा ते सातपट अधिक किंमत घेवून इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती पुढे आली आहे. इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या आईचा शुक्रवारी (दि.९) रात्री कोरोनाने मृत्यू झाला. तर मुलाची प्रकृती कोरोनाने गंभीर बनली होती. त्याचा छातीचा सीटी स्कॅन स्कोअर १५ होता. त्या मुलाला तातडीने रेमडेसिविर मिळणे गरजेचे होते. मात्र, दिवसभर भटकून त्या शेतकऱ्याला इंजेक्शन मिळाले नाही. रात्री उशिरा या शेतकऱ्याला आठ हजार रुपयांना हे इंजेक्शन मिळाले. मात्र,रुग्णाचा जीव वाचणे महत्वाचे आहे, पैसे काय आजचे उद्या कमवता येतील, या मानसिकतेतून इंजेक्शनच्या काळ्या बाजारातील चढ्या दराबाबत रुग्णाचे नातेवाईक तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे यावेळी दिसून आले.