पुणे : कोथरुड परिसरात संशयित दहशतवाद्यांना पकडणारे पोलिस अंमलदार प्रदीप चव्हाण, अमोल नजन यांच्या जिगरबाज कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्रगस्त घालत असताना रात्री अडीच वाजता त्यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना ताब्यात घेतले. त्यांना नावे विचारल्यावर त्यांनी खोटी नावे सांगितली. मोबाईल नंबर विचारला. मोबाईल क्रमांकाची ॲपद्वारे पडताळणी केली तेव्हा आरोपींनी सांगितलेली नावे खोटी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
रात्रपाळीचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी यांना कळविले. त्यानंतर त्यांनी पोलिस अंमलदार बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांची टीम तयार करुन घरझडती घेतली. अधिक तपासात ते एनआयएचे फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी ही कामगिरी करणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पोलिस अंमलदार यांना पोलिस आयुक्तालयात बोलावले. पोलिस आयुक्त रितेशकुमार आणि पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.