अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतूक; राहुल गांधी म्हणतात लोकशाही धोक्यात, रावसाहेब दानवेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 12:41 PM2023-06-25T12:41:29+5:302023-06-25T12:43:45+5:30
मोदी सरकार हे देशातील शेतकरी, दिनदुबळे, सर्वसामान्य नागरिकांसाठी समर्पित सरकार
आळंदी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे परदेशात सांगतात. याउलट अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष भारताच्या लोकशाहीचे कौतूक करतात. मोदी सरकार हे देशातील शेतकरी, दिनदुबळे, सर्वसामान्य नागरिकांसाठी समर्पित सरकार आहे अशी घोषणा २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केली होती. त्यानुसार गेल्या ९ वर्षांत लोकहितासाठी केंद्र सरकार काम करीत असल्याचे असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
तीर्थक्षेत्र आळंदी - देवाची येथे शिरुर लोकसभा मतदार संघातील ‘‘मोदी@९ महा-जनसंपर्क अभियान’’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, समन्वयक ॲड. धर्मेंद्र खांडरे, माजी आमदार योगेश टिळेकर, विस्तारक श्रीकृष्ण देशमुख, विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे कोविडच्या महामारीत जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असतानाही मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी भारतात राहीले. कोविड प्रतिबंधक लस निर्माण करुन संपूर्ण जगाला लस पुरवठा केला आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस उपलब्ध केली. देशातील ८० कोटी लोकांना धान्य उपलब्ध केले. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी तेरा वर्षे काम केले. देशात ‘गरिबी हटाओ’ असा नारा दिला. मात्र, गरिबी हटली नाही. मोदी सरकारच्या काळात गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या आहेत.
शिरूर लोकसभेची जागा भाजपकडे?
आगामी लोकसभा निवडणुकीत महेशदादासारखा पैलवान लोकसभेत पाहिजे. लोकसभेत अर्थसंकल्प पाहताना मला माझ्या शेजारी महेश लांडगेंना बसलेले पाहायला आवडेल अशी इच्छा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. मात्र दानवे यांच्यासारख्या भाजपातील मजबूत नेत्याने हे सूचक वक्तव्य केल्याने शिरूर लोकसभेची जागा भाजपकडे असेल असाच अंदाज बांधला जात आहे.
'' कोविड महामारीमध्ये मोफत लस दिल्यामुळे नागरिकांमध्ये मोदी सरकारने ‘संजीवनी’ दिल्याची भावना निर्माण झाली आहे. ज्या भारतीय नागरिकाने कोविड लस घेतली आहे. तो प्रत्येक व्यक्ती मोदी सरकारच्या चांगल्या निर्णयांचा लाभार्थी आहे. भाजपाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे याची प्रचिती ‘मोदी@९ महा-जनसंपर्क अभियान’ दरम्यान येत आहे. - महेश लांडगे, आमदार''