पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत शनिवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यात आले. मात्र, विविध अधिकारी व कर्मचा-यांना विद्यापीठ फंडातून दिल्या जाणा-या भत्त्यांबाबत प्रश्न उपस्थित करून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी काही अधिसभा सदस्यांनी केली.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आधिसभेला संबंधित करताना म्हणाले, विद्यापीठाने आपली गुणवत्ता कायम राखली असून राष्ट्रीय व जागतिक क्रमवारीत ही आपला क्रमांक अबाधित ठेवला आहे. विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात केलेली कामगिरी अधोरेखित होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटने महत्वाचे संशोधन केले. सिरम इन्स्टिट्यूटने काही संशोधनात्मक बाबी तपासण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील उपकरणांची मदत घेतली. ही बाब विद्यापीठासाठी भूषणावह आहे.
नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच आवश्यक शैक्षणिक बदल केले आहेत. तसेच 1994 पासून दिल्या जात असलेल्या भत्त्यांबाबत आत्ता प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असेही करमळकर यांनी सांगितले.
विद्यापीठ प्रशासनाने अधिसभा सदस्यांना टाळण्यासाठी ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन सभेचे आयोजन केल्याची शंका काही सदस्यांनी व्यक्त केली. तसेच परीक्षेच्या गोंधळाबाबत नाराजी व्यक्त करून विद्यापीठाची कंपनी ऑनलाइन परीक्षा घेण्यास खरंच सक्षम आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचप्रमाणे विद्यापीठातील वरिष्ठ अधिका-यांसह कर्मचा-यांना दिल्या जाणा-या भत्त्यांची चौकशी करावी, असा सूर अधिसभेत उमटला. त्यामुळे आधिसभेचे वातावरण काही कालावधीसाठी गंभीर झाले.