उरुळी कांचन : येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेमार्फत २७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आमदार फंडातून ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीसाठी २५ लाख देणार असल्याचे मत आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.जिल्हा परिषद व ग्रामपंचायत उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने मंजूर झालेल्या कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, तसेच मुक्तार पाटील सामाजिक शिक्षण संस्था, समिधा फाउंडेशन, बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन, तसेच विशेष ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून आमदार बाबूराव पाचर्णे उपस्थित होते. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप उपस्थित होते. प्रदीप कंद म्हणाले, ‘‘गावाचा विकास करताना पक्षीय विचार बाजूला ठेवून सर्वांनी एकविचाराने प्रथम गावाचा विकास साधावा. फक्त निवडणुकीच्या वेळीच राजकारण करावे. आम्ही सध्या तेच धोरण राबवीत असल्याने शिरूर-हवेली मतदारसंघात प्रचंड वेगाने विकासकामे पूर्ण करीत आहोत. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीसाठी १० लाख रुपये ग्रामपंचायत फंड व ३० लाख रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल.कांतिलाल उमाप म्हणाले, ‘‘गावातील स्वच्छता हाच गावाचा आरसा आहे. ओढ्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून जमिनीत मुरविणे, महिलांची आरोग्य तपासणी अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, बाजीराव सायकर, शिवाजी खलसे, दशरथ काळभोर, पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे, सरपंच अश्विनी कांचन, उपसरपंच सुनील कांचन, ग्रामपंचायत सदस्य सुनील दत्तात्रय कांचन, संतोष कांचन, राजेंद्र जगताप, समता जगताप, सारिका लोणारी, राजश्री वनारसे, कविता खेडेकर उपस्थित होते.
पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजुरी
By admin | Published: April 25, 2016 2:01 AM