लाखेवाडी: केंद्र शासनाचे इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याने साखर उद्योगाला इथेनॉलचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची क्षमता प्रतिदिनी ३० हजारावरून एक लाख पाच हजार केएलपीडी करण्यासाठी विस्तारवाढ केली जाणार आहे. त्याकरिता प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळाली असून लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होईल, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची सन २०२०-२१ वर्षाची २३ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी कारखान्याच्या शहाजीराव पाटील सभागृहामध्ये उत्साहात पार पडली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. यावेळी सभेत मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
यंदाच्या गळीत हंगामापासून कारखाना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने बायो सीएनजी गॅस निर्मितीचा देशातील सहकारी तत्त्वावरील पहिला महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करीत आहे. सदर प्रकल्प देशात आदर्शवत असा असणार आहे, अशी माहिती देऊन हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. कारखान्याने अहवाल २०२०-२१ वर्षात ५, ५९, ७९६ मे.टन उसाचे गाळप करून ४, ८९, ८०३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा १०.२७ मिळाला आहे. तर सहवीज निर्मिती प्रकल्पातून ४, ६६, ३०, ३६३ युनिट उत्पादन घेऊन २, ८०, ३३, २०० युनिट वीज विक्री केली आहे. तसेच इथेनॉल प्रकल्पातून १, ८,२,७७९ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. त्याचप्रमाणे कृषिरत्न सेंद्रिय खताच्या ५१ हजार बॅगची निर्मिती करण्यात आली आहे. कारखान्याची उसाची एफआरपी २२६९ रुपये असून आजअखेर २१५० रुपये रक्कम अदा केली आहे. उर्वरित देय ११९ रुपये लवकरच अदा केली जाईल,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
कारखान्याचे चालू वर्षीच्या गळीत हंगामापासून ऊस वाहतुकीचे २५० ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर चालविण्यात येणार आहेत. आगामी गळीत हंगामात कारखाना सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे. इथेनॉलचे १ कोटी ७५ लाख लिटर निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे पाटील यांनी भाषणात सांगितले.
सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, किरण पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, माणिकराव खाडे, गोविंद रणवरे, युवराज रणमोडे उपस्थित होते. सभेत विषयांचे वाचन कार्यकारी संचालक डी.एन.मरकड यांनी केले. आभार उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले.
नीरा -भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभेत मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
२५०९२०२१-बारामती-०६