पुणे : बैलगाडा शर्यतीला मान्यता हा राज्यातील शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. भाजप प्रदेश कार्य समितीच्या बैठकीसाठी पुण्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री असताना बैलगाडा शर्यती सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र काहींनी त्याविरोधात याचिका दाखल केली. त्यामुळे यासंदर्भात शास्त्रीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने बैल हा धावणारा प्राणी आहे असा अहवाल दिला. आमदार महेश लांडगे, राहूल कूल यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यापूर्वी राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. या निर्णयामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले. यावेळी जल्लीकट्टू हा तमिळनाडू राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असल्याचे विधिमंडळाने घोषित केले आहे, तेव्हा न्यायपालिका यापेक्षा वेगळा विचार करु शकत नाही. कायदेमंडळ हे ठरवण्यासाठी सर्वात योग्य आहे, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.
हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय आहे. आम्ही जी मेहनत केली आज ती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे. आमचा कायदा आणि आम्ही केलेला रिपोर्ट या दोन्ही गोष्टी सुप्रीम कोर्टाने योग्य ठरविले आहे, असंही फडणवीस म्हणाले.