पुणे : वाहनतळ (पे पार्किंग) धोरणावर चर्चा करण्यासाठी महापौर निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडत या धोरणाला तीव्र विरोध केला. वरिष्ठांच्या आदेशामुळे धोरण मंजूर करावे लागेल, अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची समजूत घातली.स्थायी समितीमध्ये मंजूर झालेले वाहनतळ धोरण लगेचच सर्वसाधारण सभेत घेण्यात आले. शुक्रवारीच (उद्या) ही सभा होत आहे. रस्त्यावर लागणाºया प्रत्येक वाहनाला दर तासाला शुल्क आकारणी या धोरणात नमूद केली आहे. त्यामुळेच नगरसेवकांनी त्याच्या विरोधी भूमिका घेतली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक आदी बैठकीला उपस्थित होते.बहुसंख्य नगरसेवकांनी या धोरणाविरोधी भूमिका मांडली. औंध-बाणेर-बालेवाडी म्हणजे पुणे नाही हे कोणीतरी आयुक्तांना समजावून सांगा. ते गेले तरी आम्हाला प्रभागातच काम करायचे आहे. हे धोरण अमलात आले तर मतदार पाय ठेवू देणार नाहीत. पक्षाची प्रतिमा खराब होईल. आयुक्तांचे ऐकू नका, अशा भावना विविध नगरसेवकांनी व्यक्त केल्या. महापालिकेचे प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला यांना बैठकीत बोलावण्यात आले. त्यांनाही नगरसेवकांनी अनेक प्रश्न विचारून हैराण केले. स्थायी समितीने हा प्रस्ताव महिनाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असताना तो अचानक समितीत मंजुरीसाठी आणण्याचे कारणच काय, अशी विचारणा केली. त्यानंतर नगरसेवकांनी काहीही माहिती न देता तोच प्रस्ताव लगेचच सर्वसाधारण सभेत आणलाच कसा, असा सवाल काही नगरसेवकांनी उपस्थित करून नाराजी व्यक्त केली.नगरसेवकांनी सभेला अनुपस्थित राहू नये, विषय चर्चेला आल्यावर सभागृहात पूर्ण उपस्थिती हवी, असा आदेशच शहराध्यक्षांसह पदाधिकाºयांनीही नगरसेवकांना दिला. तसा पक्षादेश काढावा, असे शहराध्यक्षांनी सभागृह नेत्यांना सांगितले.चुकीचे असताना पार्किंग धोरण का राबवायचेवाहनतळ धोरण मंजूर करण्याबाबत पक्षात वरिष्ठ स्तरावरून आदेश आहेत. ते नामंजूर झाले तर मेट्रोसाठी तसेच अन्य योजनांसाठी देण्यात येणाºया निधीवर परिणाम होऊ शकतो, असे पदाधिकाºयांनी नगरसेवकांना स्पष्ट केले. मात्र तसे असले तरी हे धोरणच चुकीचे आहे व ते कशासाठी राबवायचे, असा प्रश्न नगरसेवकांनी विचारला.त्याला उत्तर देणे पदाधिकाºयांना अशक्य झाले. बोनाला यांनी धोरणातील अनेक मुद्दे समजावून दिले, तरीही नगरसेवकांचे समाधान झाले नाही. आम्ही या धोरणाला विरोध करणार किंवा सभेला उपस्थितच राहणार नाही, अशी भूमिका काही नगरसेवकांनी जाहीरपणे घेतली.
वरिष्ठांमुळे धोरण मंजूर, भाजपा बैठकीत नगरसेवक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 3:22 AM