मंचर येथे पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या अस्मिता भवन इमारतीमागे पशुसंवर्धन खात्याच्या दवाखान्याच्या आवारात उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय तात्पुरत्या जागेत गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. तेथे काम करताना जागा अपुरी पडत होती.येथे अनेक अडचणींवर मात करून कार्यालयीन कामकाज चालू आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील नागरिक विविध दाखल्यांसाठी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. छोट्या जागेमुळे कामकाजात अडथळा निर्माण होत होता. येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधण्यासाठी निधीची आवश्यकता होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन कोटी ३४ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले होते. या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याचे पत्र महसूल व वन विभागाचे राज्याचे सहसचिव अजित देशमुख यांनी दिले. कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधकामासाठी दोन कोटी ३४ लाख रुपयांची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:11 AM