पुणे : पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांसाठी स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत ९८ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली. या वेळी कोणते नालेसफाई कशी करणार यावर काहीही चर्चा झाली नाही. प्रशासनाने ठेवलेला विषय विनाचर्चा मंजूर करण्यात आला. दरवर्षी महापालिका प्रशासन या एका विषयावर कोट्यवधींचा खर्च करते व तरीही थोडा पाऊस झाला तरी नाले तुंबून वाहू लागतात.त्यातही यापूर्वी ही निविदा एकदा प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. नाला सफाई करणे, आवश्यक असेल तर नवे बांधकाम करणे, पावसाळी लाईन टाकणे अशा स्वरूपाची ही कामे असून, दोन विभागात या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.कोथरूड, औंध, बावधन, पाषाण, मंगळवार पेठ, शनिवार पेठ, दत्तनगर, वडगाव बुद्रुक, कोंढवा बेसिन या भागात पावसाळी पाण्याच्या व्यवस्थापनासाठी नाला सुधारणा करणे, कल्व्हर्टर बांधणे, पावसाळी लाईन टाकणे या कामासाठी निविदा काढण्यात आली होती. विश्रांतवाडी, मेंटल हॉस्पिटल, येरवडा, हडपसर, शिवाजीनगर बेसिन या ठिकाणी पावसाळी पाण्याच्या व्यवस्थापनासह विविध कामे करण्यासाठी निविदा काढण्यातआली होती.फेरनिविदेत त्याला दोन ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला. या दोन्ही ठेकेदारांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. आता तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेऊन या ठेकेदारांनी त्वरित नालेसफाईची कामे सुरू करणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
९८ कोटींची निविदा चर्चेविना केली मंजूर
By admin | Published: May 03, 2017 2:58 AM