पुणे : येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लिक्विड आॅक्सिजन टँक उभारण्यासाठी, ४१ लाख ७७ हजार ५९८ रुपयांच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे़ याचबरोबर दळवी रुग्णालयामधील आॅक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या बॅकअपसाठी २०० केव्हीए क्षमतेचे डिझेल जनरेटर पुरविण्यासाठी ११ लाख ८० हजार रुपयांच्या निविदेस स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली़ नायडू रुग्णालयातून आॅक्सिजन सिलिंडर रिफिल करून नेण्याचा त्रास यामुळे वाचणार आहे़ दरम्यान, नायडू रुग्णालयात आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी, यापूर्वीच महापौर निधीतून १ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे या तरतुदीनुसार वीस दिवसांत हा प्रकल्प उभारण्यासाठी एक कोटी ६८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला आज मान्यता दिली.
या निर्णयाबरोबरच माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, संरक्षण दलांमधील शौर्यपदकधारकांना त्यांच्या मालकीच्या निवासी मालमत्तेच्या मालमत्ता करातून राज्य शासनाच्या आदेशाच्या दिनांकापासून सवलत देण्यास मान्यता दिली. मात्र, मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर, या निर्णयावर कार्यवाही केली जाणार असल्याचेही रासने यांनी सांगितले़
------------------
कचरा व्यवस्थापनासाठी ६ कोटी ५६ लाख
रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीतील घनकचऱ्याचे शास्त्रीयदृष्ट्या विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे व विल्हेवाट लावण्यासाठी चार ठेकेदारांना, ८७५ रुपये प्रति मेट्रिक टन दराप्रमाणे ६ कोटी ५६ लाख २५ हजार रुपयांच्या कामासाठी निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत़ तर, नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्र पाच वर्षे चालविण्यासाठी ७ कोटी ७१ लाख ३३ हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली असल्याचेही हेमंत रासने यांनी सांगितले़
----------------------