पुणे : शहरामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे परवाने देण्यास मुख्य सभेकडून मंजुरी देण्यात आली. गटई कामगारांना महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये बंदिस्त स्टॉल द्यावेत, असे आदेश नगरविकास विभागाकडून काढण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, हा निर्णय घेण्यात आला.गटई व्यावसायिकाला सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल. गटई व्यावसायिकांमध्ये ५० मीटरचे अंतर असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात संरक्षणासाठी त्यांना प्लॅस्टिक छताचा वापर करता येईल. पालिका क्षेत्रामध्ये देण्यात येणारे स्टॉल हस्तांतरित करता येणार नाहीत. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, नगरसेविका संगीता देशपांडे व दीपाली ओसवाल यांनी याबाबतचे पत्र दिले होते.महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये बीआरटीच्या कामासाठी असलेल्या तरतुदीमधून साडेतीन कोटींचे वर्गीकरण प्रभाग क्रमांक ३०मध्ये देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर मांडण्यात आला होता. यावर किशोर शिंदे यांनी आक्षेप घेतला. पालिका प्रशासनाने १६५ कोटी रुपयांच्या बीआरटी प्रकल्पाचे टेंडर मान्य केले असून, वर्क आॅडर देण्यात आली आहे. त्यामुळे या निधीचे वर्गीकरण प्रशासनाने करू नये. त्यावर यंदा ३० कोटी रुपयेच खर्ची पडणार असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला. (प्रतिनिधी)
गटई कामगारांना स्टॉल परवाने देण्यास मंजुरी
By admin | Published: January 11, 2017 3:42 AM