लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अकरा गावांमध्ये मैलापाणी वहन व्यवस्था, मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी, ३९२ कोटी ९६ लाख रुपयांची प्रकल्पीय तरतूद करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
याबाबत समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी माहिती दिली. ते म्हणाले, समाविष्ट ११ गावांमध्ये मैलापाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात सुचविल्यानुसार मलपाणी गोळा करण्यासाठी १११ किलोमीटरच्या मलवाहिन्या आणि ५७ किलोमीटरच्या मुख्य मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अस्तित्वातील १४ किलोमीटरच्या मलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्याला अनुक्रमे १०० कोटी ६३ लाख रुपये, १०१ कोटी ८ लाख रुपये आणि १३ कोटी ३७ लाख रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आलेली आहे. मांजरी बुद्रूक येथे ९३.५० एमएलडी आणि केशवनगर येथे १२ एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी १७७ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून, हा एकूण खर्च ३९२ कोटी ९६ लाख रुपये इतका आहे़
सदर काम पुढील तीन आर्थिक वर्षांत तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता कलम ७२ ब अंतर्गत (पुढील तीन वर्षांतील खर्चाचे दायित्व स्वीकारून) पुढील तीन वर्षांसाठी आवश्यक असणारी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
-----