- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाच स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, पाचपैकी भाजपाचे माउली थोरात आणि बाबू नायर या दोघांच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे केतन कांबळे यांनी यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कायदेशीर नोटीस बजावून थोरात आणि नायर यांची स्वीकृत नगरसेवकपदी शिफारस करू नये, अशी मागणी केली आहे. सदस्य निवडीवरून आयुक्तांना नोटीस भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी केलेल्या शिफारशीनुसार आयुक्त हर्डीकर यांनी या पाचही जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. मात्र, माउली थोरात आणि बाबू नायर यांच्या नावावर रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) आक्षेप घेतला आहे. कांबळे यांनी वकिलामार्फत आयुक्त हर्डीकर यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. थोरात यांनी कासारवाडीत अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच बाबू नायर यांनी विश्व विवेक फाउंडेशन या नोंदणीकृत सार्वजनिक संस्थेचे पदाधिकारी नाहीत. त्याचप्रमाणे या संस्थेचे लेखापरीक्षण झालेले नसल्याचे नोटिसीत म्हटले आहे.