पुणे : अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ या दरम्यान उड्डाणपूल करण्याच्या कामास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत मंजूरी देण्यात आली. ४१ कोटी रूपये खर्चाच्या या कामाने आता निविदा मंजूरीचा टप्पा ओलांडला असून ३० एप्रिलला (शुक्रवारी) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते तसेच महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुलाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक व महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. या रस्त्यावरून सातत्याने अवजड वाहनांची वर्दळ असते. लहान वाहनधारकांना त्याचा त्रास होतो. शहराबाहेर जाणारी वाहनांचीही याच रस्त्याने ये-जा सुरु असते. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून उड्डाणपुल काही वर्षांपुर्वी प्रस्तावीत करण्यात आला होता, मात्र त्याचे काम पुढे सरकत नव्हते.भिमाले यांनी सांगितले की मागील ९ वर्षांपासून या पुलासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. महापालिकेने मागील वर्षी कोणतेही उड्डाणपुल करायचे नाहीत असा निर्णय घेतला होता, त्यामुळे त्या वर्षी पुलाचे नियोजन झाले नाही. मूळ नियोजन गंगाधाम चौकापर्यंत होते. त्यासाठी ७५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. एकाच पुलासाठी तेवढा खर्च करणे महापालिकेला शक्य होणार नव्हते. त्यामुळे अखेर अप्सरा चित्रपटगृहापासून ते वखार महामंडळार्पंयत हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. एरवी महापालिकेच्या प्रत्येक कामाची निविदा विहित किमतीपेक्षा जादा दराने दाखल केली जात असते, ही निविदा मात्र १४ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे. या कामाची मुदत सुरू झाल्यापासून पुढे दीड वर्ष इतकी आहे. पूल दोन्ही बाजूंनी वाहतूक होणारा असेल. एका खांबावर तो उभा केलेला असणार आहे. त्यामुळे मुळ रस्त्याचा फार कमी भाग त्यामुळे व्यापला जाणार आहे अशी माहिती भिमाले यांनी दिली.
अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ साकारणार उड्डाणपूल, स्थायी समितीची मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 8:35 PM
अप्सरा चित्रपटगृहापासून ते वखार महामंडळार्पंयत हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. एरवी महापालिकेच्या प्रत्येक कामाची निविदा विहित किमतीपेक्षा जादा दराने दाखल केली जात असते, ही निविदा मात्र १४ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे.
ठळक मुद्दे३० एप्रिलला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते तसेच महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते भूमिपूजन