एआरएआयच्या वतीने येत्या २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ दरम्यान सिंम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०२१ (एसआयएटी २०२१) या प्रसिद्ध वाहनविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले असून याची माहिती देण्यात आली. यावेळी एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे, आनंद देशपांडे, उपसंचालक विजय पंखावाला, परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. सुकृत ठिपसे, सह संयोजक बी. व्ही. शामसुंदर उपस्थित होते.
डॉ. मथाई म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जर्स हे प्रामुख्याने बाहेरील देशामधून आयात करण्यात येतात. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या उपक्रमांमध्ये सहभागी होत आता एआरएआयने लाईट ईव्ही एसी चार्ज पॉईंट तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान भारत चार्जर्स स्टॅण्डर्स, कॅडेमो (CHAdeMO), सीसीएस (कंबाईन्ड चार्जिंग सिस्टिम्स) यांच्या तोडीचे आहे. याद्वारे भारतीय कंपन्यांना आता या स्वदेशी चार्जरचे उत्पादन करता येणे शक्य होणार असून हे चार्जर देखील स्थानिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे.
आनंद देशपांडे म्हणाले की, एआरएआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या वतीने भारत एसी ००१ या पहिल्या चार्जरची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक टेस्टिंग हे एआरएआय प्रयोगशाळेत पूर्ण झाले आहे.
एसी ००१ चार्जर हा एसी चार्जर असून चार चाकी गाड्यांसाठी त्याचा वापर करणे शक्य आहे. हा चार्जर सिंगल फेज असून त्याची बॅटरी २३० व्होल्ट १५ ॲम्पिअर इतक्या क्षमतेची आहे.
----------
कुशल मनुष्यबळाची गरज
येणाऱ्या काळात देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता एआरएआयच्या वतीने कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. केरळ व तेलंगणा येथील राज्य सरकारांशी याविषयीची प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती नितीन धांडे यांनी दिली.