पुणे : भाडेवाढीचा फायदा घेण्यासाठी रिक्षाचालकांना मीटरचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक रिक्षाचालक प्रमाणीकरण न करताच प्रवाशांकडून जादा भाडे घेत आहेत. जुन्या मीटरप्रमाणे जेवढे भाडे होईल, त्यापेक्षा १० ते २० रुपये जास्त घेतले जात आहेत. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांकडून प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेऊन उघडपणे फसवणूक केली जात आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १ जुलैपासून रिक्षा भाडेवाढ लागू केली आहे. त्यानुसार पहिल्या किलोमीटरसाठी १ रुपया तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ६६ पैसे भाडेवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही भाडेवाढ लागू होण्यापूर्वी रिक्षाचालकांना मीटरचे सुधारित वाढीनुसार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी १४ आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे. वजनमापे विभागाकडून प्रमाणीकरण करून दिले जात आहे. मीटरचे प्रमाणीकरण केलेले नसल्यास रिक्षाचालकांनी जुन्या भाडेदराप्रमाणेच प्रवाशांकडून पैसे घ्यावेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्या वेळीच स्पष्ट केले आहे. मात्र, त्याकडे अनेक रिक्षाचालकांनी काणाडोळा केल्याचे दिसते.मीटर प्रमाणीकरण झालेले नसतानाही अनेक रिक्षाचालक प्रवाशांकडून १० ते २० रुपये जास्त घेत आहेत. अंतरानुसार जादा भाडे आकारले जात आहे. प्रवाशांना रिक्षात बसण्यापूर्वीच मीटर प्रमाणीकरण झाले नाही, त्यामुळे मीटरपेक्षा १० किंवा २० रुपये जास्त घेतले जातील, असे स्पष्टपणे सांगितले जाते. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण जादा भाडे देण्यास तयार होतात. पैसे देण्यास नकार दिल्यास थेट भाडे नाकारले जाते. दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास ५० हजार रिक्षा आहेत. या रिक्षांच्या मीटरच्या प्रमाणीकरणासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोमवारपर्यंत जवळपास १५ हजार रिक्षांच्या मीटर प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप सुमारे ३५ हजार मीटर प्रमाणीकरणाचे काम राहिले आहे. याविषयी बोलताना विभागीय वैधमापन शास्त्र उपनियंत्रक धनवंत कोवे म्हणाले, की मीटर प्रमाणीकरणासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. दररोज सुमारे १२०० मीटरचे प्रमाणीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पाच ट्रक तयार करण्यात आले आहेत. रिक्षाचालकांनी प्रमाणीकरणासाठी यावे, असे आवाहन कोवे यांनी केले.
रिक्षाचालकांची मनमानी भाडेवाढ
By admin | Published: July 21, 2015 3:27 AM