पुणे : हाॅटेलमध्ये गेल्यावर टेबल मिळाले की खुर्चीवर बसल्यावर साधी विचारपूस न करता त्वरित सीलबंद मिनरल पाण्याची बाँटल आणून ठेवली जाते. परंतु त्याअगोदर पाणी कोणते हवे, साधे की मिनरल असा प्रश्नही आजकाल हॉटेलवाल्यांकडून विचारला जात नाही आणी सर्रास पाण्याच्या बाटलीचे बील लावतात.
मॉल, मल्टिप्लेक्स मधील फुडमाँल मध्ये पाण्याच्या बाटलीवरील छापील किमतीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बाटल्यांची विक्री होत आहे. परंतु याबाबत कोणतीही कारवाई पालिकेकडून होताना दिसत नाही. हॉटेलमधील असाच एक अनुभव पुण्यातील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडिक यांना आला. त्यावर त्यांनी आपला अनुभव लोकमतला सांगितला.
शनिवारचा दिवस होता, मी माझी मुलगी आणि मुलगा असे तिघे बालगंधर्व नाट्य मंदिरजवळ घुले रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो. तेथील वेटरने आम्हाला न विचारता मिनरल पाण्याची बाटली आमच्यासमोर आणून ठेवली. मी त्यांना विचारले की हे पाणी फ्रीमध्ये आहे का ? त्यावेळेस वेटर म्हणाले नाही, मग आम्ही ऑर्डर न देता पाण्याची बाटली का दिली ? आपल्याकडे महानगरपालिकेचे पाणी येते ते एक्वागार्डने शुद्ध करून दिले जात नाही का? त्यावर वेटरने नाही असे उत्तर दिले आणि आमच्याकडे एक्वागार्ड नाही असे सांगितले. त्यावेळेस मी वेटरला तुमचे मॅनेजर कोण आहे त्यांना बोलवा. मॅनेजर आले आणि त्यांना विचारले, पण वेटर जे बोलला तेच मॅनेजरनेही स्पष्ट शब्दात सांगितले की, "आमच्याकडे महानगरपालिकेचे पाणी येते, पण त्यावर एक्वागार्ड बसवलेले नाही. तुम्हाला महानगरपालिकेचे पाणी पाहिजे असेल तर घ्या!
अलीकडे सामान्य नागरिकदेखील आपल्या घरामध्ये एक्वागार्ड बसवतो आणि एवढे मोठे संदीप हॉटेल पण तिथे एक्वागार्डचे पाणी मिळत नाही आणि लोकांना न विचारता पाण्याची बाटली आणून ठेवली जाते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ते अप्रत्यक्षपणे पाण्याचा पैसा येणाऱ्या ग्राहकांकडून वसूल करतात आणि आपणही काही न बोलता आपले "प्रेस्टिज"साठी हे बंद बाटलीतले पाणी घेत असतो. खरे तर हॉटेल मालकांनी एक्वागार्डचे शुद्ध पाणी देणे त्याचे कर्तव्य आहे, पण असे तिथे दिसून आलेले नाही. याला "पैशाची लूट" म्हणावी लागेल अशी भावाना सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडिक यांनी व्यक्त केली. पालिकेकडून हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्समधील मनमानी कारभारावर नियम करून दिले पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलवरील छापील किमतीव्यतिरिक्त इतर जास्तीची किंमत घेणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.