पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (nilam gorhe) यांनी पानिपतला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर दिल्लीमध्ये पुरातत्त्व खात्याच्या संचालकांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याकडे पानिपतमधील स्मारक, कुरुक्षेत्र विकास तसेच राज्यातील पुरातन मंदिरांमध्ये विकास कामे करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली.
डॉ. गोऱ्हे यांनीच शनिवारी ही माहिती दिली. एप्रिलच्या सुरुवातील डॉ. गोऱ्हे यांनी दिल्ली दौरा केला. त्यात त्यांनी पानिपत, कुरुक्षेत्र परिसरास भेट दिली. त्याविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या. पानिपतचे युद्ध मराठी माणसासाठी महत्त्वाचे युद्ध आहे. तिथे असणाऱ्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. साधे पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध होत नाही. दरवर्षी साधारण एक लाख लोक या स्मारकाला भेट देतात. मात्र त्यासाठी तिथे काहीही व्यवस्था नाही. माहिती फलक, ग्रंथालय, पिण्याचे पाणी, उपाहारगृह, गाईड अशा अनेक गोष्टी होण्याची गरज आहे.
महाभारत युद्धभूमी म्हणून कुरुक्षेत्राचेही महत्त्व आहे. पाच जिल्ह्यांचा हा परिसर आहे. तिथे एक हजारापेक्षा जास्त मंदिरे आहेत. मात्र याही भागाचा विकास झालेला नाही. तिथे महाराष्ट्र भवन उभे करण्याची गरज आहे. सर्व मंदिरांमध्येही विकास कामे होण्याची गरज आहे. स्थानिक स्तरावर विचारणा केली असता, पुरातत्त्व खात्याकडून परवानगी मिळत नाही, असे कळले. त्यामुळे पुरातत्त्व खात्याच्या महासंचालक व्ही. विद्यावती यांची भेट घेतली व त्यांच्याकडे या सर्व गोष्टींची मागणी केली, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पुरातत्त्व खात्याकडे असणाऱ्या जुन्या वास्तूंच्या विकासात पुरातत्त्व खात्याकडूनच अनेक अडचणी उभ्या केल्या जातात. परवानगी दिली जात नाही. याचे उदाहरण देताना कार्ला येथील एकवीरा देवीच्या मंदिराच्या पायऱ्या दुरुस्त करण्यासाठी दिलेल्या निधीचा पुरातत्त्व खात्याच्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी विनियोगच केला नाही असे विद्यावती यांच्या निदर्शनास आणले, असे गोऱ्हे म्हणाल्या.
हरियाणा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न
पानिपत, कुरुक्षेत्र विकासासाठी हरियाणा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू तसेच मुंबईतील दौऱ्यात राज्यातील वास्तूंची माहिती घेऊन त्याकडे लक्ष देऊ, असे विद्यावती यांनी सांगितले असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.