पुणे : “सहकार क्षेत्रापुढे अनेक आव्हाने आहेत मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास त्यावर मात करता येईल. सहकारी बँकांनी सामान्य व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करून अडीअडचणीच्या काळात मदत केली असल्याने सहकारी बँकांचे योगदान महत्त्वाचे आहे,” असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
बँकेच्या अध्यक्षपदी असताना महेश लडकत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अर्चना यांची बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली. त्यावेळी बापट बोलत होते. बँकेचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कुलकर्णी, तज्ज्ञ संचालक दिनेश गांधी व महेंद्र काळे, बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक संदीप खर्डेकर, दिलीप उंबरकर, पांडुरंग कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष लीना अनास्कर, संचालक निरंजन फडके, मनोज नायर, गोकुळ शेलार, सीताराम खाडे, राजन परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
बापट यांच्या हस्ते अर्चना लडकत यांचा संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. “माझे पती महेश लडकत यांचे स्वप्न मी पूर्ण करेन. बँकेच्या कामात जबाबदारीने लक्ष घालेन,” असे अर्चना लडकत म्हणाल्या. शिरीष कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.