ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 29 - अवघ्या महाराष्ट्रला वेड लावलेल्या सैराट या चित्रपटाची नायिका आर्ची उर्फ रिंकू राजगुरु, नायक परश्या उर्फ आकाश ठोसर व चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे बनविण्याचे काम पुर्ण झाले असून ते 1 मे पासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळ्यातील आंतरराष्ट्रीय र्कितीचे सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियमचे डायरेक्टर सुभाष कंडलूर व वँक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी दिली.
भारतातील पहिले वँक्स म्युझियम केरळ येथिल वँक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी लोणावळ्यात सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियम या नावाने सुरु केले आहे. गेल्या दहा वर्षात राजकिय, सामाजिक, कला, क्रिडा, चित्रपट, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात कार्य करणार्या शंभराहून अधिक सेलिब्रेटींचे हुबेहुब मेणाचे पुतळे या वँक्स म्युझियममध्ये कलावंत सुनिल कंडलूर यांनी साकारले आहे.
सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राला वेड लावणारे लोकप्रिय कलाकार आर्ची, परश्या व नागराज यांचे पुतळे येथे हुबेहुब बनविण्यात आले आहेत. कामाच्या व्यापामुळे त्यांना या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येण्यास विलंब होत असल्याने 1 मे या कामगार दिनाचे औचित्य साधत सैराट फेमचे हे तिनही मेणाचे पुतळे नागरिकांन पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असल्याचे कंडलूर यांनी सांगितले.