खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील पूर येथील पुरातन कुकडेश्वर मंदिराच्या कळस उभारणीसाठी पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांनी अंदाजपत्रक व अहवाल तयार करण्यासाठी नासाडिया वास्तुविशारद या संस्थेची नियुक्ती केली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
पुरातन कुकडेश्वर मंदिर हे राज्य संरक्षित असल्याने त्याची मालकी राज्य पुरातत्त्व विभागाकडे आहे. कुकडेश्वर देवस्थान हा जुन्नर तालुक्यातील विशेषतः आदिवासी बांधवांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार पुरातत्व विभागाने दिलेल्या ड्राईंग व अंदाजपत्रकानुसार या निधीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले. परंतु पुरातत्व विभागाने मंदिराच्या कळसाचे ड्राईंग व अंदाजपत्रक दिले नसल्याने हे काम करता आले नव्हते. तेव्हापासून कुकडेश्वर मंदिर कळसाशिवाय असल्याने स्थानिक जनतेने सातत्याने कळस उभारणीचे काम व्हावे, यासाठी आग्रह धरला होता. परंतु पूर्वी कळस होता. याबाबत काहीही माहिती उपलब्ध नसल्याने पुरातत्व विभागाकडून सातत्याने नकार दिला जात होता.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. कोल्हे यांची भेट घेऊन कुकडेश्वर मंदिराच्या कळसाचे काम व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार डॉ. कोल्हे यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. तसेच रितसर पत्र पाठवून कळस उभारणीची मागणी केली होती.
त्यानुसार डॉ. गर्गे यांनी पुरातत्व विभाग, पुणे येथील सहाय्यक संचालकांना मंदिराच्या कळसाचा प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांनी नासाडिया वास्तुविशारद संस्थेच्या अर्चना देशमुख यांची नियुक्ती केली असून, मंदिराच्या कळसाचा प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिराच्या कळसाचा प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यात आल्याने आता कुकडेश्वर मंदिरावर कळस उभारणीबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यासंदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, सर्वप्रथम राज्यमंत्री आदिती तटकरे आणि डॉ. गर्गे यांचे मनापासून आभार. कारण कळसाशिवाय मंदिर ही संकल्पनाच मुळात कुणाला रुचणारी नव्हती. त्यामुळे कळसाचे काम व्हायला हवे. या उद्देशाने पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉ. गर्गे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला, शिवाय कार्यवाहीचे निर्देशही दिले. त्यामुळे आता या कामाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने कळसासह कुकडेश्वर मंदिराचे पाहिलेले स्वप्न नक्की पूर्ण होईल.