पुणे : पोटासाठी गाव सोडून पुण्यात आलेल्या 15 बांधकाम मजूरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुर्घटनेप्रकरणी अल्कॉन लॅन्डमार्क्स या बांधकाम व्यावसायिकासह आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर, कांचन ग्रुपचे संचालक यांच्यासह लेबर कॉन्ट्रॅक्टरचे परवाने महापालिकेने रद्द केले आहेत. हे परवाने का रद्द करण्यात येऊ नयेत अशी विचारणा करणारी नोटीस संबंधितांना पाठविण्यात आली असून आठ दिवसांमध्ये याविषयीचा खुलासा मागविण्यात आला आहे.
कोंढवा भागातील तालाब कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या अल्कॉन स्टायलस या सोसायटीची सीमाभिंत खचल्याने शेजारील बांधकाम सुरु असलेल्या जागेतील कामगारांच्या झोपड्यांवर माती कोसळली होती. राडारोड्याखाली झोपड्या गाडल्या गेल्याने 15 कामगारांचा मृत्यू ओढवला होता. याठिकाणी कांचन ग्रुपच्या रॉयल एक्झॉटीक या इमारतीचे काम सुरु होते. याप्रकरणी दोन्ही कंपन्यांचे संचालक, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटकही करण्यात आलेली आहे. या घटनेची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी आदेश दिले होते. अतिरीक्त जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये महापालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, पालिकेने कांचन ग्रुपच्या रॉयल एक्झॉटीक इमारतीच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे. तर अल्कॉन लँडमार्क्सचे संचालक जगदीश अगरवाल, संचालक विवेक सुनिल अगरवाल, आर्किटेक्ट सुनिल हिंगमिरे, स्ट्रक्चरल इंजिनिअर अकील शेख यांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. हिंगमिरे यांच्याविरोधात कौन्सिल आॅफ आर्किटेक्ट यांच्याकडेही तक्रार केली जाणार आहे.यासोबतच कांचन ग्रुपचे पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मिकांत गांधी यांचेही परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. त्यांची महापालिकेकडील नोंदणी रद्द करून नवीन प्रस्ताव दाखल करण्यास बंदी घातली आहे.पालिकेच्या बांधकाम विभागाने सर्वांना नोटीस पाठविली असून तुमचे परवाने रद्द का करण्यात येऊ नयेत याविषयी येत्या आठ दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले आहेत. घटनास्थळाला समितीने भेट दिली असून त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त होताच तो शासनाला पाठविण्यात पाठविण्यात येईल असे अधिकाºयांनी सांगितले. ===== पालिकेच्या हद्दीमध्ये सुरु असलेल्या बांधकाम साईट्सवरील कामगारांच्या शेड आणि उपनगरांमध्ये शेतजमिनींवर उभ्या असलेल्या इमारतींच्या सिमाभिंतीचे सर्वेक्षण बांधकाम विभागाने सुरु केले आहे. बांधकाम साईटवरील मजुरांची संख्या, घरांची सुरक्षा, सुरक्षाविषयक साधने याचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अथवा कामगारांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीच्या त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. ===== पालिकेने अल्कॉन लँडमाकर््स आणि कांचन ग्रुप या कंपन्यांची पालिकेकडील नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यांना नवीन बांधकाम प्रस्ताव दाखल करण्यासाठीही बंदी घालण्यात आली आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून आठ दिवसांत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असून या कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करण्याचा विचार सुरु आहे. - प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता, बांधकाम विभाग