पुणे: सध्या शहरीकरण वाढले आहे. त्यामुळे फुलपाखरांची आवश्यक झाडे, वनस्पती कमी हाेत आहेत. त्यांची जी वनस्पती असेल, त्यावरच ती अंडी घालतात. इतर कोणत्याही झाडावर अंडी घालत नाहीत. जमिनीचा वापर वेगळ्या गोष्टीसाठी होत आहे. नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. रोपं नाहीशी झाली की, त्यावरील फुलपाखरंही दिसत नाहीत. परिणामी फुलपाखरांचा अधिवास नष्ट होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
परागीभवनाबराेबर वनस्पतींचे वंश विस्तारण्यात महत्त्वाची असलेल्या फुलपाखरांचे महत्त्व अनमाेल आहे. सप्टेंबर महिन्यात फुलपाखरे अधिक पाहायला मिळतात. त्यांची संख्या वाढते. त्यासाठीच सप्टेंबर महिना हा ‘बटरफ्लाय मंथ’ समजला जातो. यानिमित्त युवा फुलपाखरू संशोधक रजत जोशी याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
फुलपाखरांचे महत्त्व काय?
‘बटरफ्लाय मंथ’ हा प्रत्येक सप्टेंबर महिन्यात साजरा होतो. जून ते सप्टेंबरपर्यंत जो पाऊस पडतो. तो सप्टेंबर महिन्यात थांबतो आणि ऊन येते. हे ऊन कीटक आणि प्राण्यांना महत्त्वाचे असते. फुलपाखरू हे थंड रक्ताचे असते. त्यामुळे त्याला शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी उन्हामध्ये यावे लागते. ही प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात होते आणि त्यात अधिक फुलपाखरू दिसायला लागतात.
जैवविविधतेमध्ये फुलपाखरांचे महत्त्व काय?
लहान मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सर्वांचे जैवविविधतेमध्ये महत्त्व असते. फुलपाखरू हा एक कीडा आहे. तो अतिशय सुंदर दिसतो. फुलपाखरू परागीभवन प्रचंड प्रमाणात करते. फुलपाखरू, मधमाशी किंवा गांधील माशीला पराग वेचायला वेगळा अवयव नसतो. त्यांच्या अंगावर ते पराग चिकटतात आणि परागीभवन होते. फुलपाखरू हे वनस्पतींवर अवलंबून असते आणि वनस्पती फुलपाखरावर त्याच्या परागीभवनासाठी अवलंबून असते. दोघांचे सहजीवन असते.
पुण्यात कुठे अधिवास आहे?
पुणे जिल्ह्यामध्ये दोनशेहून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. शहरातील वेताळ टेकडी, महात्मा टेकडी, तळजाई टेकडी येथे अधिवास आहे. काही वर्षांपासून त्या अधिक दिसत आहेत. कारण त्यात अधिक नागरिक निरीक्षण करण्यात सहभागी झालेत. नवनवीन फुलपाखरे समोर येत आहेत.
फुलपाखरांचे कुळ आहेत का?
फुलपाखरांचे सहा कुळ असतात. त्यांच्या उडण्यावरून, दिसण्यावरून ते कुळ ठरते. अंगावरील विविध रूप, रचना, आकार यावरून ते ठरते. पहिले कुळ स्वालोटेल. यांना छोटी शेपटी असते. राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन हे त्यातले आहे. दुसरे कुळ लायसेडिनी. त्याला नील कुळही म्हणतात. या फुलपाखरांच्या आतील भागाला नीळा रंग असतो. तिसरे कुळ पिवळे कुळ. ज्याला पीरिडी म्हणतात. माळरानावर अधिक फुलपाखरं असतात. त्यात ग्रास यलो असतो. चौथा कुळ कुंचलपाद (नीम्फॅलिडी) असे म्हणतात. सर्वसाधारण फुलपाखराला सहा पाय असतात, याला चारच पाय असतात. ब्लू टायगर यात येतो. पाचवे कुळ हीसफिरीडी आहे. अर्थात स्वीफ्ट असेही म्हटले जाते. सर्वांत अधिक वेगाने उडतात. आकार छोटा असतो. सहावे कुळ रियोडिनिडी अर्थात ज्युडी (रत्न) असे म्हटले जाते. या फुलपाखरांवर मेटालिक शेड असतात. यात एकच सदस्य आपल्याकडे दिसतो तो म्हणजे डबल बॅन्डेड ज्युडी दिसतो. ज्युडीसारखे रंग असतात. डोळा हिरवा असतो.