पुणे : सुशिक्षित तरुणाला विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नका. एवढेच काय, तर त्यांना वाचविण्यासाठी येणाऱ्यांविराेधातदेखील कडक कारवाई करावी, असे आदेश केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी दिले आहेत. सोशल मीडियावर अनेकांचे रिल्स, फोटो व्हायरल होत असताना पुणेपोलिस डोळे झाकून बसलेत का? याबाबत पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कोथरूड परिसरात जाब विचारल्यामुळे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मारहाण झालेला तरुण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडिया हॅन्डल करतो, असे बोलले जात होते. त्यावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मारहाण झालेला तरुण माझ्या कार्यालयात काम करत नसून, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र, कार्यकर्ता म्हणून नव्हे तर पुण्यातील प्रत्येक तरुण किंवा नागरिकावर पोलिसांची कडक भूमिका पाहिजे. माझ्या पुणे शहराचे नाव अशा पद्धतीने खराब होत असेल तर ते चालून देणार नाही. शहरातील हे सगळे थांबले पाहिजे, अन्यथा आमच्या पद्धतीने आम्ही काम करू, असेही मोहोळ यांनी ठणकावून सांगितले.
पुणे शहर विद्येचे माहेर घर व इतर कारणांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे एखाद्या टोळीकडून मारहाण होत असेल, तर पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच मारहाणीचा विषय हा एका कार्यकर्त्याचा विषय नसून संपूर्ण पुणेकरांच्या सुरक्षिततेचा विषय आहे. जो कोणी चुकेल त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, या मताचा मी आहे. - मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक राज्यमंत्री