पुणे: शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी शालेय विद्यार्थ्यांची बस वाहतूक किती सुरक्षित आहे? असा प्रश्न आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेतील चर्चेत उपस्थित केला. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व बसचे ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली.
औचित्याच्या मुद्याद्वारे त्यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर सभागृहात ही चर्चा झाली. आमदार शिरोळे म्हणाले, पुणे शहरात ८ हजारपेक्षा अधिक बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते. शाळेत नेताना व आणताना दोन वेळा ही वाहने रस्त्याने जा ये करतात. त्यांच्या वाहनाची स्थिती कशी आहे?, चालक प्रशिक्षित आहे का? वाहने सुरक्षित आहेत का? अशा अनेक गोष्टी यात आहेत. त्यामुळे या सर्व वाहनांची तपासणी सक्तीची करावी, त्यासाठी वाहन उद्योग क्षेत्रातील तज्ञ असावेत अशी मागणी शिरोळे यांनी केली.
त्याचबरोबर आग किंवा यासारखी कोणतीही दुर्घटना घडली तर अशा प्रसंगी काय करावे याबाबतचे प्रशिक्षणही अग्निशमन दराच्या जवांनांना दिले जावे, कारण या बसमध्ये शाळेची मुले असतात, त्यांना सुरक्षितपणे बसच्या बाहेर काढणे गरजेचे असते. याबाबतचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे, त्यामुळे सरकारने या सर्व गोष्टींचा गंभीरपणे विचार करावा असे शिरोळे यांनी सांगितले.