Dilip Walse Patil: भाजपवाले सगळेच धुतल्या तांदळासारखे आहेत का? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 04:45 PM2022-04-04T16:45:32+5:302022-04-04T16:46:22+5:30
केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून लोकशाहीत भाजपला विरोध करणाऱ्या नेत्यांना अडचणीत आणुन सहकारी संस्था संपविण्याचे काम केंद्र सरकार करत आहे
टाकळी हाजी : केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून लोकशाहीत भाजपला विरोध करणाऱ्या नेत्यांना अडचणीत आणुन सहकारी संस्था संपविण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपवाले सगळेच धुतल्या तांदळा सारखे आहेत का? त्यांच्यावर का धाडी पडत नाही? असा सवाल राज्यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. मलठण ता शिरूर येथे विविध विकास कामांच्या कार्यक्रमाप्रसंगी गृहमंत्री वळसे पाटील उपस्थित होते. या प्रसंगी ते बोलत होते.
वळसे पाटील म्हणाले, काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा इतिहास पुसण्याचे काम सुरु आहे. जाती धर्मात विष पेरून राजकीय पोळी भाजून घेण्याचे षडयंत्र हे देशासाठी खुप धोकादायक आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टिकेला उत्तर देताना, वळसे पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी या राज्यात सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या राज्यांतील जनतेच्या जीवनात विज, पाणी, धरणे, रस्ते, उदयोगधंदे या माध्यमातून विकास करण्याचे काम शरद पवार यांनी केले. मात्र काही लोक फक्त पवारांचे नाव घेऊन टिका करायची, धर्माधर्मात भांडणे लावण्याचे काम करत आहेत.
अजान सुरु होताचं गृहमंत्र्यांनी थांबवले भाषण...
मलठण येथे सभेत भाषण सुरु असतानाच अचानक भोंग्या मधून अजानाचा आवाज आला. त्यावेळी वळसे पाटील आता काय करणार याकडे उपस्थितांचे लक्ष होते. मात्र तत्काळ गृहमंत्री वळसे पाटील यांनी भाषण बंद करून शांत उभे राहीले. व अजान संपल्यावर पुन्हा भाषण सुरु केले. यावेळी गृहमंत्री म्हणाले की, प्रत्येक धर्माचा आदर करण्याचे काम सर्वानी केले पाहीजे. हा देश एकसंघ व येथील जनतेची एकात्मता टिकविण्यासाठी अनेक साधुसंत विचारवंत नेते स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारक यांनी कष्ट केले आहेत. मात्र सध्या जाती धर्मात मतभेद निर्माण करीत विष पेरण्याचे काम काही लोक करत आहेत. हे मोठे दुर्देव असुन याबाबत कार्यकर्त्यांनी जागृती निर्माण केली पाहीजे.