उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? : अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 06:12 AM2019-01-29T06:12:06+5:302019-01-29T06:12:38+5:30
बाहेरचा उमेदवार लादू नका, असे सांगण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या पुणे लोकसभेच्या काँग्रेस इच्छुकांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का?’ असा रोकडा सवाल केल्याचे समजते.
पुणे : बाहेरचा उमेदवार लादू नका, असे सांगण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या पुणे लोकसभेच्या काँग्रेस इच्छुकांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का?’ असा रोकडा सवाल केल्याचे समजते. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करून शहर शाखेच्या ‘बाहेरून उमेदवार नको’ या ठरावाचा नक्की विचार केला जाईल, असे सांगितले असल्याची माहिती मिळाली.
काँग्रेसच्या शहर शाखेने याआधीच आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड व पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांची नावे निवड समितीकडे पाठविण्याचा ठराव केला. निवड समितीने त्यावर शिक्कामोर्तब करून ती नावे प्रदेशकडेही पाठविली आहेत. तरीही पक्ष उमेदवार आयात करणार आहे, अशी चर्चा सुरू झाल्यामुळे यातील काही इच्छुकांनी थेट दिल्लीत पक्षाचे राज्याचे प्रभारी व लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे हेही त्यांच्यासमवेत होते. ‘आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या; मात्र बाहेरचा उमेदवार नको असे,’ या इच्छुकांनी खर्गे यांना सांगितले. प्रदेश शाखेकडून तसा रीतसर ठराव येऊ द्या, असा सल्ला खर्गे यांनी या इच्छुकांना दिला. त्यामुळे त्यांनी प्रजासत्ताकदिनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट घेतली. त्यांच्याकडेही त्यांनी बाहेरचा उमेदवार लादू नका, अशा मागणी केली. शहर शाखेने तसा ठराव करून पाठविला आहे. आता प्रदेशने तो काँग्रेस महासामितीला पाठवावा, अशी विनंती त्यांनी प्रदेशाध्यक्षांना केली. यावर चव्हाण यांनी उमेदवारी करण्याबाबत तुम्ही खरेच गंभीर आहेत का, असा सवाल त्यांना केला असल्याचे समजते. चव्हाण यांच्या या सवालाने सगळेच इच्छुक गडबडले. महासमितीने फक्त तीनच इच्छुकांची नावे मागितली आहेत; त्यामुळे यातून कोणाला बाहेर पडायचे असेल तर आत्ताच पडावे, असेही चव्हाण यांनी त्यांना सुचवले असल्याचे समजते. या चर्चेनंतर चव्हाण यांनी सर्वांबरोबर वैयक्तित चर्चाही केली. त्यात प्रामुख्याने खर्च कसा करणार, हा प्रश्न विचारण्यात आला. मतदारसंघांची यापूर्वीची माहिती, पक्षाची तसेच वैयक्तिक प्रभावस्थळेही याबाबतही त्यांना विचारणा केली. त्यावरून आता प्रदेश समिती या पाच जणांपैकी तीन जणांची नावे महासमितीला पाठविणार आहे. कोणाची नावे वगळणार, याबाबत चव्हाण यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही; मात्र वैयक्तित चर्चेतून त्यांनी ते निश्चित केले असल्याची चर्चा आहे.
निष्ठावंतही सक्रिय
काँग्रेसच्या पुण्यातील इच्छुकांनी लोकसभेसाठी सर्वांत आधी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या उसळत्या वारूला पक्षाबाहेरून उमेदवार येणार, या चर्चेने खीळ बसली आहे. पक्षाबाहेरच्या पुण्यातीलच एका उमेदवाराने पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त करून त्या संदर्भात प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली असल्याची चर्चा पुण्यात जोर धरत आहे. त्यामुळे धास्तावलेले इच्छुक दिल्ली, मुंबईत जाऊन निष्ठावंतांच्या नावाचा जोर धरत आहेत.