दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू लाडक्या नव्हत्या का? विनेश फोगाट यांचा सवाल
By राजू इनामदार | Published: November 18, 2024 04:46 PM2024-11-18T16:46:46+5:302024-11-18T16:48:48+5:30
राजकारणात मला ना मुख्यमंत्री व्हायचे आहे, ना पंतप्रधान. फक्त माझ्यावरच नाही तर कोणत्याही महिलेवर कसलाही अन्याय होऊ नये, असे मला वाटते
पुणे : निवडणुकीच्या तीन महिने आधी लाडकी बहीण योजना आणली. दिल्लीत भर रस्त्यांवर अन्यायाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू तुमच्या लाडक्या नव्हत्या का, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी द्यावे, असा सवाल हरियाणातील काँग्रेस आमदार व ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीगीर महिला खेळाडू विनेश फोगाट यांनी केला. कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये, यासाठीच आपण राजकारणात प्रवेश केला आहे, असेही त्या म्हणाल्या.
पुण्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्या शहरात आल्या होत्या. काँग्रेस भवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी उपस्थित होते. पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहमंद यांनी फोगाट यांचा परिचय करून दिला.
फोगाट यांनी भाजपवर तीव्र शब्दांमध्ये हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, दिल्लीत आम्ही महिला खेळाडू आमच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन करत होतो. भाजप सरकारने आमच्याकडे साधे लक्षही दिले नाही. केंद्र व राज्य स्तरावरूनही लाडकी बहीणसारख्या योजना आणल्या जात आहेत. मात्र, त्या निवडणुकीच्या आधी तीन महिने आणल्या. यावरून त्यांचा हेतू दिसतो. आम्ही लाडक्या बहिणी नव्हतो का, असा प्रश्नही फोगाट यांनी केला.
राजकारणात मला ना मुख्यमंत्री व्हायचे आहे, ना पंतप्रधान. फक्त माझ्यावरच नाही तर कोणत्याही महिलेवर कसलाही अन्याय होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळेच मी राजकारणात प्रवेश केला आणि जाणीवपूर्वक काँग्रेसची निवड केली. आता आमदार म्हणून मला कोणत्याही महिलेच्या विरोधात दाद मागता येईल.
महाराष्ट्रातच नाही तर देशातील बहुतेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणे आखली जात आहेत, कायदे केले जात आहेत. त्याविरोधात दिल्लीत ११ महिने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यांच्याकडेही भाजप सरकारने लक्ष दिले नाही. तब्बल ११ महिन्यांनंतर ते कायदे मागे घेतले. दरम्यान, ७०० शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रातील मतदारांनी या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहनही फोगाट यांनी केले.