कवठे येमाई/मलठण (पुणे): येथील शिंदेवाडीत रविवारी (दि. २८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे व संजय रखमा शिंदे या स्थानिकांमध्ये पूर्वीच्या हाणामारीच्या व जमिनीच्या वादातून अचानक वादावादी होऊन तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये संजय रखमा शिंदे (वय ३५) यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी भानुदास ज्ञानोबा शिंदे आणि ज्ञानोबा गोविंद शिंदे यांच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठणच्या शिंदेवाडी येथे यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. या वेळी घाटातच शिंदेवाडी येथील भावकीतील दोन कुटुंबांत वादावादी झाली.
पूर्वीच्या हाणामारीच्या वादातून त्यांच्यात कायम शिवीगाळ होत होती. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये संजय रखमा शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भानुदास शिंदे आणि ज्ञानोबा शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाणामारीनंतर बैलगाडा शर्यत बंद -
या हाणामारीनंतर येथील बैलगाडा शर्यती तातडीने बंद करण्यात आल्या. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून जाहीर करण्यात आले आहे. संजय शिंदे यांचे निधनाने शिंदेवाडी परिसरामधे दुखःचे वातावरण आहे. संजय यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील व एक भाऊ आहे.