पुणे : क्रेडिट कार्डवरून पैसे काढून एकमेकांना देत असताना झालेल्या वादातून एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
शहानवाज ऊर्फ बबलू असे खून झालेल्याचे नाव आहे. नोमान जावेद खान (वय २४, रा. उंड्री) याला कोंढवापोलिसांनी पकडले असून, साहिल युसूफ शेख (वय २५, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), साजुद्दीन सद्दाम शेख (वय ३५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांनी खून केल्यानंतर अंगावरील रक्ताचे डाग असणारे कपडे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळल्याचे समोर आले आहे. याबाबत समीर मुनीर सय्यद (रा. ताहिर हाईट्स, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
अधिक माहितीनुसार, शहानवाज हा जागा खरेदी-विक्रीचे तसेच मिळेल ते काम करत होता. तो नेहमीप्रमाणे घरातून कामानिमित्त सामेवारी बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, सकाळी लुल्लानगर येथे जाण्यासाठी पारसी ग्राऊंडवरून काही महिला पायी निघाल्या होत्या. त्यांना त्याचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. तो शहानवाज याचा असल्याचे दिसून आले. त्याच्या पोटावर उजव्या आणि डाव्या बाजूला धारदार हत्याराने भोसकल्याचे व गळा चिरल्याचे दिसत होते. याबाबत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना एकमेकांसमोर बसवून खुनाचे कारण तपासण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप भोसले अधिक तपास करत आहेत.