कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदेंसोबत खडाजंगी अन् सह्यांवरून वाद?; अजित पवारांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 02:45 PM2024-08-15T14:45:29+5:302024-08-15T14:48:53+5:30
अजित पवार यांनी माध्यमांकडून देण्यात येत असलेलं वृत्त फेटाळत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे.
Ajit Pawar Pune ( Marathi News ) :राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाइल्सवर केल्या जाणाऱ्या सह्यांवरून वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कथित वादावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, "माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. सरकारमध्ये आम्ही सर्वजण एकोप्याने काम करत आहोत. मागे पण काही जणांनी चुकीची बातमी दिली की मी वेशभूषा आणि नाव बदलून दिल्लीला गेलो होतो. मी कशाला नाव बदलू? आई-वडिलांनी मला इतकं सुंदर नाव ठेवलं आणि मला माझ्या नावाचा अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी परवा जळगावच्या कार्यक्रमात एकत्र गेलो, नंतर मुंबईलाही एकत्र आलो. मात्र विरोधकांना आता कोणतंही काम उरलं नसल्याने त्यांच्याकडून वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे," असा पलटवार अजित पवारांनी केला आहे.
कॅबिनेट बैठकीत काय घडलं? नेमकी काय चर्चा सुरू?
राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईल्सवरील सह्यांवरून मोठा वाद झाल्याचं बोललं जात आहे. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याने त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईल्सवर मीही सह्या करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी संघर्षाच्या चर्चा फेटाळल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळणार का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.