भिगवण (पुणे) : दुचाकीला कट मारल्याच्या वादातून झालेल्या किरकिरीची माफी मागण्याचा बहाणा करून बदला घेण्यासाठी आलेल्या टोळक्याने धारदार शस्त्राने दुसऱ्याच तरुणावर वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दौंड पोलिस ठाणे हद्दीतील स्वामी चिंचोली येथे घडली. या संदर्भात रावणगाव पोलिस ठाण्यात ५ आरोपींविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवम कांबळे (रा. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या इतर ४ साथीदारांनी पळ काढला आहे. याबाबत राहुल राजेंद्र ढवळे (रा. मदनवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत सांगितलेल्या घटना क्रमानुसार फिर्यादी राहुल याचा भाऊ अक्षय जनावरांचा चारा घेऊन येत असताना आरोपी शिवम कांबळे याने दुचाकीला कट मारून उलट अक्षय यालाच शिवीगाळ करीत गाडीच्या चाव्या काढून घेतल्या होत्या. त्यावेळी राहुल याने फोन करून समंजसपणा दाखवत वाद मिटविला होता. चार दिवस उलटून गेल्यावर राहुल याला शिवमने फोन करून माफी मागावयाची असल्याचे सांगून भेट घेण्याचे सांगितले. मात्र, राहुल हा विशाल धुमाळ या हॉटेल व्यावसायिकासोबत दौंड हद्दीतील स्वामी चिंचोली येथे असल्यामुळे शिवम त्याला त्याच ठिकाणी आलो म्हणून भेटण्यास गेला.
सोबत दोन दुचाकीवर ४ साथीदार होते. पाचही आरोपींनी राहुल असणाऱ्या ठिकाणी जात मी शिवम कांबळे आहे. तूच राहुल आहेस का असे म्हणत विशाल आणि राहुल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दोन साथीदार यांनी राहुल याला पकडून धरत दुसऱ्या दोघांनी विशाल याला पकडून ठेवत शिवम याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने विशाल याच्यावर वार केले. त्यावेळी दोघांनी आरडाओरडा सुरू केला असता यातील दोन आरोपींनी जखमी विशाल याच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन दुचाकीवरून धूम ठोकली. आरडाओरडा झाल्यामुळे जमलेल्या जमावाने शिवम याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण घटनेशी हॉटेल व्यावसायिक विशाल धुमाळ यांचा काडीमात्र संबंध नसताना राहुल समजून आरोपी शिवम याने विशाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात गंभीर जखमी धुमाळ यांना बारामती येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले.