लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित १५ हजार डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या पहिल्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या डालीबोर सेव्हर्सिना याने अव्वल मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देत खळबळजनक निकालाची नोंद केली. तर, भारताच्या अर्जुन कढे, इशाक इकबाल, मनीष सुरेशकुमार, एन. विजय सुंदर प्रशांत या खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या डालीबोर सेव्हर्सिना याने भारताच्या अव्वल मानांकित सिद्धार्थ रावतचा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. डालीबोरने सिद्धांतचे आव्हान १ तास २८ मिनिटांत मोडीत काढले. सामन्यात २-१ अशा फरकाने सिद्धांत आघाडीवर असताना डालीबोरने जोरदार कमबॅक करत सातव्या, नवव्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-४ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये देखील सिद्धांतला अखेरपर्यंत सूर गवसलाच नाही. या सेटमध्ये डालीबोरने वर्चस्व राखत दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस भेदली व हा सेट ६-१ असा एकतर्फी जिंकून विजय मिळवला.
भारताच्या सहाव्या मानांकित मनीष सुरेशकुमार याने इटलीच्या लोरेंझो बोकचीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. हा सामना १ तास ४१ मिनिटे चालला. भारताच्या सातव्या मानांकित अर्जुन कढे याने एस. डी. प्रज्वल देवचा टायब्रेकमध्ये पराभव करून आगेकूच केली. हा सामना १ तास ५० मिनिटे चालला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या इशाक इकबालला पुढे चाल देण्यात आली. सामन्यात पहिला सेट इशाकने लुका विरुद्ध ६-३ असा सहज जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये २-० अशी स्थिती असताना लुकाला हाताला दुखापत झाल्यामुळे त्याने सामन्यातून माघार घेतली. क्वालिफायर भारताच्या एन विजय सुंदर प्रशांत याने फैजल कुमारचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : पहिली (मुख्य ड्रॉ) फेरी : एकेरी :
डालीबोर सेव्हर्सिना, चेक प्रजासत्ताक वि.वि. सिद्धार्थ रावत (१) ६-४, ६-१,
डॉमिनिक पॅलन, चेक प्रजासत्ताक वि.वि. रणजीत विराली-मुरुगुसेन, भारत ७-६ (६), ६-१,
मनीष सुरेशकुमार, भारत (६) वि.वि. लोरेंझो बोकची, इटली ६-१, ६-४,
झेन खान, अमेरिका (८) वि.वि. अभिनव शाण्मुगम ६-२, ६-०,
अर्जुन कढे, भारत (७) वि.वि. एस डी प्रज्वल देव ६-३, ७-६ (३),
ऑलिव्हर क्रॉफर्ड, अमेरिका (४) वि.वि. अथर्व शर्मा ६-१, ६-०,
एडन म्युकुक, ग्रेट ब्रिटन (३) वि.वि.ओमनी कुमार, अमेरिका ६-२, ७-६ (४),
एन विजय सुंदर प्रशांत वि.वि.फैजल कुमार ६-४, ६-२,
इशाक इकबाल, वि.वि. लुका कॅस्टेलनुव्हो, स्वित्झर्लंड, ६-३, २-० सामना सोडून दिला,
सिमॉन कार, आर्यलँड (२) वि.वि. ध्रुव सुनिश ६-२, ३-६, ६-४,
दुहेरी गट : पहिली फेरी :
मार्को ब्रुगेनरोटो, इटली-डेव्हिड पोझी, इटली वि.वि. साहिल गवारे-गुंजन जाधव २-६, ६-३, १०-८,
फिलीप बर्गेव्ही, स्वीडन-जोनाथन म्रीधा, स्वीडन (३) वि.वि. जोनाथन बायडिंग, ग्रेट ब्रिटन-हेनरी पॅटन, ग्रेट ब्रिटन (५) ६-७, ६-३, १०-४.