पुणे : ‘लोकमत’ या पुण्यासह राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असलेल्या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर गटाच्या मुख्य शर्यतीत अर्जुन प्रधान, चंद्रकांत मानवडकर, स्वाती गाढवे, मनोहर जेधे, मीना देसाई, तन्मया करमरकर आणि मॅथियस राऊश्चेनबर्ग यांनी आपापल्या गटामध्ये विजेतेपद पटकाविले.
व्हीटीपी रिअॅल्टी प्रस्तुत आॅक्सिरिचच्या सहयोगाने आणि बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने आयोजित ही ‘लोकमत महामॅरेथॉन’ रविवारी (दि. १७) झाली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून सुरू झालेली ही शर्यत त्याच संकुलात संपली. सेनादलाच्या पुरूष गटामध्ये २१ किलोमीटरच्या शर्यतीत अर्जुन प्रधान अजिंक्य ठरला. त्याने हे अंतर १ तास ९ मिनिटे ८ सेकंदांत पार केले. अभिमन्यू कुमार आणि अनुज कुमार अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले.
२१ किलोमीटर पुरुषांच्या खुल्या गटात चंद्रकांत मानवदकर याने पहिले स्थान प्राप्त केले. त्याने १ तास ९ मिनिटे ५६ सेकंद अशी वेळ देत वक्या पडवी आणि बबन चव्हाण यांना मागे टाकले. २१ किलोमीटर स्पर्धेत महिलांच्या गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वाती गाढवे हिने बाजी मारली. तिने १ तास २६ मिनिटे ८ सेकंद वेळेत शर्यत जिंकत विनया मालुसरेला मागे टाकले. १ तास २७ मिनिटे १४ सेकंद वेळ देणाऱ्या विनयाला दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. रेश्मा केवटे तिसरी आली.२१ किलोमीटर गटामध्ये सेनादलाच्या महिला गटात १ तास ३० मिनिटे ३९ सेकंद वेळेसह मीना देसाईने अव्वल स्थान प्राप्त केले. २१ किलोमीटरमध्ये प्रौढ पुरुषांच्या गटात मनोहर जेधे यांनी प्रथम स्थान प्राप्त केले. तर प्रौढ महिला गटात तन्मया करमरकर अजिंक्य ठरल्या. याच अंतराच्या आंतरराष्ट्रीय गटामध्ये मॅथियस राऊश्चेनबर्ग प्रथम आला.
१० किलोमीटर शर्यतीत पुरुषांच्या गटात शानदार सिंग याने, प्रौढ महिला गटात कविता रेड्डीने, प्रौढ पुरुषांच्या गटात सुहास आंबराळे याने प्रथम स्थान प्राप्त केले. याच अंतराच्या महिला गटाच्या शर्यतीत प्राजक्ता शिंदे अव्वल ठरली. उत्तर प्रदेशच्या शांती राय हिने दुसरे स्थान प्राप्त केले. पुण्याची प्रियांका चवरकर तिसºया क्रमांकावर राहिली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या संस्थापक रुचिरा दर्डा, ‘लोकमत’चे संपादक प्रशांत दीक्षित, व्हीटीपी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक भूषण पालरेशा, व्हीटीपी रिअॅल्टीचे सीईओ सचिन भंडारी, आर. एम. धारिवाल फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा र. धारिवाल, बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डॉ. सागर बालवडकर, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया, झेनिथ अॅडव्हान्स फर्टिलिटीच्या डॉ. ममता दिघे, एसटीए हॉलिडेजचे संचालक अजित सांगळे, बिझ सेक्युअर लॅबचे सचिन हिंगणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड, ‘लोकमत महामॅरेथॉन’चे रेस डायरेक्टर संजय पाटील, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे आणि वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, संचेती हॉस्पिटलचे डॉ. नीरज आठवले, संदीप विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉ. राजशेखर तालिकोटी, फ्रुटेक्सचे गोविंद भोजवानी, विंटोजिनोचे श्रीहरी नरवडे, मल्टिफिटचे महाव्यवस्थापक संदिप्ता दास, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संदीप पाटील, सिनेतारका इशा अग्रवाल, सायली संजीव, राधिका देशपांडे, बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे डॉ. राजेश देशपांडे आणि त्यांचे सहकारी यांच्या हस्ते झाले.या वेळी ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’चे कार्यकारी संचालक करण दर्डा, ‘लोकमत’च्या इम्प्लिमेन्टेशन विभागाचे महाव्यवस्थापक आशिष जैन, ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.