पुणे : शत्रूच्या सैन्यांना धडकी भरविणाऱ्या अत्याधुनिक अशा स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्यांच्या मारक क्षमतेत वाढ करण्यासाठी पुण्याने मोलाचे योगदान दिले आहे. या रणगाड्यांसाठी अत्याधुनिक स्फोटकांचे संशोधन पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) व हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबॉरेटरी (एचईएमआरएल) या लष्करी संस्थांनी केले आहे. अर्जुन रणगाड्यांवरून या स्फोटकांची यशस्वी चाचणी ओडिशामध्ये घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ही स्फोटके लष्करात दाखल होण्याची शक्यता वाढली आहे.कोणत्याही युद्धात सैनिकांबरोबर अत्याधुनिक शस्त्रे महत्त्वाची असतात. यामध्ये रणगाड्यांचे महत्त्व जास्त आहे; पण भारतीय लष्कराकडील बहुतांशी रणगाडे हे परदेशी बनावटीचे आहेत. त्यामुळे त्यांच्या वापरावर आणि दारूगोळ्यावरील संशोधनावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे लष्कराच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन (डीआरडीओ) संस्थेने स्वदेशी बनावटीच्या रणगाड्यांची निर्मिती सुरू केली. यापैकी एक अर्जुन रणगाडा.
- या संशोधित स्फोटकांमध्ये पेनेट्रिएशन कम ब्लास्ट (पीसीबी) हे रणगाड्यांच्या आत जाऊन स्फोट करणारे स्फोटक आणि थेरबोबॅरिक अॅम्युनेशन (टीबी) या फ्युएल एअर बेस असलेल्या म्हणजेच, जास्त दाहक क्षमता असलेल्या स्फोटकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही स्फोटके अर्जुन रणगाड्यांच्या गरजेनुसार डिझाइन करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे.