जेजुरी (पुणे) : तीर्थक्षेत्र जेजुरीत किरकोळ कारणातून नगरपालिकेसमोर कोयता व तलवारीने दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. यात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पहिल्यांदाच शहरात असा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत जेजुरी पोलिसांनी कोयता-तलवारीने वार करून जखमी केलेल्या पाच जणांवर शुक्रवारी (दि. २४) रात्री बेकायदेशीर जमाव जमवून धमकी, शिवीगाळ, मारहाण करीत गंभीर जखमी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
बेकायदेशीर प्राणघातक शस्रे बाळगून हल्ले केल्याबद्दल शस्त्र प्रतिबंधक कायदा ४(२५) तसेच अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्राॅसिटी) २०१५ चे कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जखमी झालेले गौतम भीमराव भालेराव (वय ४०, रा. जेजुरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. तर नारायण वामन जाधव, ओंकार नारायण जाधव, मंगलेश नारायण जाधव, विपुल मोरे, योगेश हरणावळ (सर्व रा. जेजुरी) अशी आरोपींची नावे आहेत.
दाखल झालेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि. २४) दुपारी ३:३०च्या सुमारास बसस्थानकासमोरील एका दुकानात ओंकार जाधव व गौतम भालेराव यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादानंतर ओंकार याचे वडील नारायण जाधव यास फोन करून बोलावून घेण्यात आले. सर्वांमधील संवादानंतर समज देत सर्वजण तेथून निघून गेले. त्यानंतर दुपारी ४:२०च्यादरम्यान नारायण जाधव याने भ्रमणध्वनीवरून फिर्यादी गौतम भालेराव यास ‘माझ्या मुलाला शिवीगाळ का केलीस?,’ असा जाब विचारत नगरपालिकेसमोर बोलावले.
यावेळी गौतम भालेराव यांच्यासोबत त्यांचे भाऊ म्हाळसाकांत भालेराव, सिद्धांत भालेराव, आदित्य भालेराव, विजय भालेराव हे सर्वजण नगरपालिकेसमोर आले असताना आरोपींनी तलवार, ऊस तोडायचा कोयता व दगडाने जिवे मारण्याच्या हेतूने हल्ला करीत मारहाण केली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून, गौतम भालेराव यांच्या डोक्याला, विजय भालेराव यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे तर म्हाळसाकांत भालेराव यांची हाताची बोटे तुटली आहेत. येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेतील ओंकार जाधव व मंगलेश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुणे येथील सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित तीन जणांचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमेश तावसकर हे पुढील तपास करीत आहेत.