पुणे : जम्मू-काश्मीरमध्ये लष्करातर्फे जवळपास १८ वर्षांनंतर रमजान महिन्यात शस्त्रसंधी करण्यात आली. या काळात दहशतवादाकडे वळलेले तरुण मुख्य प्रवाहात यावेत हा उद्देश आहे. यासाठी शासकीय तसेच स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती संरक्षण विभागाच्या इंटिग्रेटेड स्टाफचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पुण्यातील गिरीनगर येथील मिलिटरी टेक्नोलॉजी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या तांत्रिक अभ्यासक्रमाचा समारोप गुरुवारी झाला. जवळपास १४६ अधिकाऱ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. लेफ्टनंट जनरल दुआ यांच्या हस्ते अधिका-यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.पत्रकारांशी बोलताना दुआ म्हणाले, सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. या पार्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये लष्करातर्फे दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई महिनाभरासाठी थांबवत शस्त्रसंधी करण्यात आली आहे. भरकटून दहशतवादाकडे वळालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या काळात प्रयत्न करण्यात येत आहेत. यात एनजीओ, शासकीय यंत्रणा तसेच ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे. या काळात दहशतवाद्यांविरोधात कुठलीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, लष्करावर हल्ला झाल्यास तसेच सैनिकांना लक्ष्य केल्यास स्वसंरक्षणासाठी कारवाई केली जाईल. सायबर आणि अंतराळ यांना सीमा नाहीत. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील संरक्षण वाढवण्यावर सध्या काम सुरू आहे. तिन्ही दलातील समन्वय वाढविण्यासाठी संरक्षण विभागाच्या तिन्ही दलांच्या अधिका-यांच्या एकत्रित प्रशिक्षणावर भर देण्यात येत असल्याचेही दुआ यांनी सांगितले.>मेजर वसीम हिरोली यांना पर्पल ट्रॉफीसैन्याच्या तिन्ही दलांतील जवळपास १४६ अधिका-यांनी मिलिटरी टेक्नोलॉजी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘टेक्निकल स्टाफ आॅफिसर्स’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. उत्कृष्ट कामगिरी करणा-या मेजर वसीम मुश्ताक हिरोली यांना ‘पर्पल ट्रॉफीने’ सन्मानित करण्यात आले.
काश्मिरी तरुणांना प्रवाहात आणण्यासाठी शस्त्रसंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 5:14 AM