रांजणगाव सांडस (पुणे) : शिरूर तालुक्याचे अंतिम टोक असलेले आरणगाव येथे पहाटे एक ते दोनच्या दरम्यान ठोंबरे वस्तीवर सशस्त्र दरोडा पडला. वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलाबाई आनंद ठोंबरे (वय 65) या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या. आनंदा सावळाराम ठोंबरे (वय 79 )हे गंभीर जखमी झाले असून पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
याप्रकरणी आनंदा ठोंबरे यांचा मुलगा बाबा ठोंबरे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील आरणगाव येथे ठोंबरे वस्तीवर हा परिवार राहत असतो. दरोडेखोरांनी वस्तीवरील इतर दरवाजांना बाहेरून कडी लावून घेतली. फुलाबाई व त्यांचे पती झोपलेल्या खोलीमध्ये दरोडेखोर शिरले. त्यांनी या वृद्ध दाम्पत्म्लाना जबरी मारहाण केली. या मारहाणीत फुलाबाई ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंदा ठोंबरे यांच्या डोक्यात धारदार वस्तूने डोक्यात मारहाण केली.
यावेळी ठोंबरे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक जागे झाले व दरोडेखोर सोने-चांदी घेऊन अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. आनंदा ठोंबरे गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली असून घटनेचा पंचनामा केला आहे. तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. 25 जुलै 2023 रोजी आलेगाव पगार परिसरातील वाकचौरे वस्ती परिसरात भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला होता. यात गोळीबार करण्यात आलेला होता.