पुणे - जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मेजर शशिधर नायर यांना वीरमरण आले. शहीद मेजर शशिधर नायर हे दहा दिवसांपूर्वीच पत्नीला अलविदा करून कर्तव्यावर निघाले होते. त्यावेळी, मी लवकरच परत येईन असे वचन शशिधर यांनी आपल्या पत्नीला दिले होते. पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शशिधर परत आले पण काहीही बोलले नाहीत. यावेळी ते परतले ते थेट तिरंग्यात लपेटून.
मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. कारण, नुकतीच कुठे तृप्ती आणि शशिधर यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती. एका नजरेतील प्रेमापासून लग्नापर्यंतचा या दोघाच्या प्रेमविवाहाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आर्मीच्या सर्कलमध्येही या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा नेहमीच रंगत होती. मात्र, काळाने घात केला आणि तृप्ती अन् भारतमातेचा रिअल हिरो आपल्याला सोडून गेला.
शशिधर आणि तृप्ती यांची पुण्यातच एका म्युचुअल मित्रामुळे भेट झाली. पहिल्याच नजरेत दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. त्यावेळी, शशि 27 वर्षांचे आणि तृप्ती 26 वर्षांच्या होत्या. दोघांनीही सहा महिन्यानंतर साखरपुडा केला. मात्र, साखरपुड्याच्या 8 महिन्यानंतर तृप्ती यांना गंभीर आजार झाला. या आजारामुळे त्यांच्या शरीराची हालचाल मंदावली. त्यांना चक्क व्हीलचेअरची गरज भासू लागली. त्यावेळी, मित्रांनी शशि यांना लग्न मोडण्याचा सल्ला दिला. मात्र, भारतमातेप्रमाणेच तृप्तीवरही तितकेच प्रेम करणाऱ्या शशिधर यांनी मित्रांना स्पष्ट नकार दिला. तसेच तृप्तीला दिलेल्या वचनाप्रमाणे 2012 मध्ये तिच्याशी लग्न केलं. तृप्तीला स्वीकारून आयुष्याच्या परीक्षेत मेजर शशि फर्स्ट क्लास उत्तीर्ण झाला होता. पण, तृप्ती यांचा हा आजार अधिकच वाढत गेला. तरीही, शशि यांनी कधीच तक्रार केली नाही. उलट, रुग्णालयात नेण्यापासून तिची सर्व काळजी ते घेऊ लागले. त्यामुळे काही दिवसांतच आर्मीच्या सर्कलमध्येही हा जोडा सर्वांचा लाडका बनला.
शशि यांची पोस्टींग हा तृप्ती यांच्यासाठी नेहमीच चिंतेच कारण असायचा. मात्र, शशि दरवेळी जाताना मी लवकच परत येईन, असे सांगून जायचे. पुण्यात एक महिन्यांची सुट्टी घालवल्यानंतर 2 जानेवारी रोजी शशि यांनी पत्नीला अलविदा केले. जाताना, लवकरच परत येईल, असे वचनही दिले. नेहमीप्रमाणे यावेळीही शशिने तृप्तीला दिलेलं वचन पूर्ण केलं. पण, यावेळी तो परतला, ते तिरंग्यात लपेटून. तृप्तीवर जिवापाड प्रेम करणारा शशि भारतमातेवरील प्रेमाखातर शहीद झाला होता. शशिला वीरमरण आले होते.