पुणे : भुलेश्वर येथे देवदर्शनाला जाताना झालेल्या किरकोळ अपघाताच्या कारणावरून लष्करी अधिकाऱ्याच्या कारचा तब्बल ३५ किलोमीटर पाठलाग करून गाडीचे नुकसान केले. तसेच पत्नीचा विनयभंग आणि अधिकाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी तिघांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी फेटाळला.
शुभम अनिल चोरगे, विशाल भंडलकर आणि अमर चव्हाण अशी त्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विश्वास सातपुते आणि मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. एस. बी. खामकर यांनी कामकाज पाहिले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. याच्या तपासासाठी तिघांना अटक करून तपास करणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्ष आणि फिर्यादीच्या वकिलांनी केला. ही घटना २८ सप्टेंबर रोजी घडली.
संबंधित लष्करी अधिकारी क्रेटा गाडीमधून कुटुंबीयांसमवेत भुलेश्वर येथे दर्शनाला चालले होते. त्यांच्या गाडीचा वेग कमी केल्याने पाठीमागून आलेल्या कारचा धक्का त्यांच्या गाडीला बसला. त्यावेळी दोघात सामंजस्याने चर्चा झाली. दोघे यवत पोलिस स्टेशन येथे गेले. तेथे पोलिसांनी सामंजस्याने दोघांना मिटविण्यास सांगितले. मात्र, घटना घडलेले ठिकाण जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीत असल्याचे सांगितले.
कारच्या मालकाने तेथे जाऊ असे म्हटले. मात्र, फिर्यादींना वेळ नव्हता. पुण्यामध्ये चर्चा करू म्हणून ते निघाले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्याने त्यांचा पाठलाग केला. डाव्या बाजूचा पुढील दरवाजा उघडला. तो धरून ठेवला असताना फिर्यादीच्या पत्नीने तो बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याने हात धरून तिचा विनयभंग केला. लहान मुलगाही घाबरला. फिर्यादी तसेच पुढे निघून आले. त्यांचा ३५ किलोमीटर पाठलाग केला. ठोसा मारून आणि गाडीच्या काचा फोडून फिर्यादीचे ५० हजारांचे नुकसान केले. फिर्यादींना डोके, हात, कान आणि पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात तिघांसह अन्य साथीदारावर गुन्हा दाखल आहे.