तळेघर : आंबेगाव तालुक्यातील अडीच वर्षाच्या अर्णव दिपक हरण ह्या मुलाने आकाशाला गवसणी घालत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला आहे. अर्णवचे वडील दिपक यशवंतराव हरण हे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील महसूल विभागामध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्यांचे मुळ गाव शिवणी बु.(जि. हिंगोली) आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अर्णव हरण या अडीच वर्षे वयाच्या मुलाने तेरा राजकीय नेते ओळखले, अठरा पाळीव प्राणी, चौदा जंगली प्राणी, पंधरा फळे, अकरा भाज्यांची नावे, बारा वाहनांची नावे, तेरा आपल्या शरीरात असलेल्या अवयवांची नावे, सहा कलर नावे, अल्फाबेटीकल वर्डस ए. बी. सी. डी. व त्यांचे अर्थ असे १२८ शब्द इंग्रजी मध्ये ओळखुन त्यांचे अर्थ मराठीमध्ये सांगितले, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा अर्णव हा सर्वात लहान वयाचा मुलगा ठरला आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्या मधुन चिमुकल्याचे कौतुक होत आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अर्णव दिपक हरण या अडीच वर्षे वयाच्या मुलाचा गुलाबपुष्प देऊन कौतुक करुन सत्कार केला. या सत्कार प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी समाजकल्याण सभापती सुभाषराव मोरमारे, सभापती संजय गवारी उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, तहसिलदार रमा जोशी,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे तलाठी दिपक हरण, वैशाली हरण आदी उपस्थित होते.