पुणे:आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. लातूर येथील उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकिय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांना अटक केली आहे. बडगिरेंनी पेपर पुरविल्याचे तसेच सदर पेपरसाठी त्यांचेच आरोग्य विभागातील डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड यांचेकडून १० लाख रु व शिपाई शाम महादू मस्के याचेकडून ५ लाख रुपये घेतल्याचे तपासामध्ये उघड झाले. या प्रकरणातील आरोपी प्रशांत व्यंकटराव बडगिरे याने पेपर कसा व कोठून मिळविला त्याचा तपास सुरू आहे.
यापूर्वी आरोग्य विभागाच्या लेखी परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी मुंबई डॉकयार्डमधील एक खलाशी आणि निवृत्त जवानाला अटक केली आहे. त्यामुळे या पेपर फुटीमध्ये अटक झालेल्यांची वाढली आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे आता आरोग्य विभागापर्यंत पोहचले आहेत.
सहा ते सात लाखांचा रेट
पेपर देण्याच्या बदल्यात एका उमेदवाराकडून ६ ते ७ लाख रुपये घेण्याचे ठरले होते. त्यापैकी ५० हजार रूपये आरोपींना मिळणार होते. बाकीची रक्कम त्यांना वरती द्यावी लागणार होती. उमेदवारांनी अद्यापपर्यंत पैसे दिले नव्हते. मात्र, यादीमध्ये नाव आल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागणार होते. त्यासाठी आरोपींनी उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे ठेवून घेतली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून उमेदवारांची मूळ कागदपत्रे देखील जप्त केली आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रविंद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, मा. भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, विजय पळसुले, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली व पो. नि. तथा तपासी अधिकारी डी. एस. हाके, पो उपनि. अमोल वाघमारे, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, नवनाथ जाधव, नितीन चांदणे, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, अनिल पुंडलीक, सुनिल सोनवणे या पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली.